Mumbai Metro Carbon Neutral
मुंबई : दहिसर पूर्व ते अंधेरी पश्चिम मेट्रो 2 अ मार्गिका आणि दहिसर पूर्व ते गुंदवली मेट्रो 7 मार्गिका यांना कार्बन न्यूट्रल प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. एमएमएमओसीएलने या मार्गिकांची कार्बन न्यूट्रॅलिटी तपासण्यासाठी तृतीयपक्षीय लेखापरीक्षण सुरू केले होते. या लेखापरीक्षणामध्ये या मार्गिका पीएएस 2060:2014 या आंतरराष्ट्रीय मानकानुसार कार्बन न्यूट्रल असल्याचे स्पष्ट झाले.
‘मेट्रो 2अ मार्गिका आणि मेट्रो 7 मार्गिकांसाठी वाहतूक पद्धतीतील परिवर्तन’ या प्रकल्पासाठी जानेवारी 2023 ते डिसेंबर 2024 या दोन वर्षांच्या कालावधीसाठी युनिव्हर्सल कार्बन रजिस्ट्रीने (यूसीआर) एमएमएमओसीएलला 85 हजार 849 कार्बन ऑफसेट युनिट्स (सीओयू) जारी केली आहेत. पुढील टप्प्यात, एमएमआरडीएने मेट्रो 2ब, 4, 4अ, 5, 6, 7अ आणि 9 या बांधकामाधीन मार्गिकांची ‘वीरा’ कार्बन रजिस्ट्रीत नोंदणी करण्याची प्रक्रिया केली आहे. ही संस्था हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी जागतिक स्तरावरील प्रमुख मानक मानली जाते.
कार्बन न्यूट्रॅलिटी म्हणजे वातावरणात सोडल्या जाणार्या कार्बनचे प्रमाण व त्याची भरपाई करणार्या प्रकल्पांमधून मिळणारे कार्बन क्रेडिट्स यांच्यात संतुलन साधणे. यामुळे एकूण कार्बन उत्सर्जन ’शून्य’ होते. मेट्रो सेवा चालवताना होणार्या उत्सर्जनात प्रामुख्याने वीज वापरामुळे होणार्या उत्सर्जनाचा समावेश होतो. हे उत्सर्जन मोजून ते वैध व प्रमाणित कार्बन क्रेडिट प्रकल्पांद्वारे या उत्सर्जनाची भरपाई करता येते. मेट्रो प्रणाली आणि रस्त्यावर चालणार्या वाहनांच्या प्रवासाच्या दर किलोमीटरमागील हरितगृह वायू उत्सर्जनाची तुलना केल्यावर तब्बल 85 हजार 849 टन कार्बन डायऑक्साइडच्या समतुल्य इतक्या उत्सर्जनात घट साधण्यात आली आहे.