

मुंबई : मेट्रो 2 ब मार्गिकेच्या डायमंड गार्डन ते मंडाळे या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण दोनदा पुढे ढकलल्यानंतर आता डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हा कार्यक्रम घेण्याचे नियोजन आहे. 4 डिसेंबरला मेट्रोच्या लोकार्पणासहीत आणखी दोन प्रकल्पांचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे समजते. मात्र अद्याप एमएमआरडीएने तारीख जाहीर केलेली नाही.
अंधेरी पश्चिम ते मंडाळे या मेट्रो 2 ब मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होऊन सीएमआरएस प्रमाणपत्र मिळाले आहे. पहिल्या टप्प्यात डायमंड गार्डन ते मंडाळे या 5.6 किमीच्या मार्गिकेचा समावेश आहे. भुयारी मेट्रोच्या अंतिम टप्प्यासोबतच मेट्रो 2 ब मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण केले जाणार होते. मात्र सीएमआरएस प्रमाणपत्र न मिळाल्याने ते लांबले.
अखेर सीएमआरएस प्रमाणपत्र प्राप्त झाल्याने ऑक्टोबरअखेरीस लोकार्पण करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ न मिळाल्याने पुन्हा हा कार्यक्रम पुढे ढकलावा लागला.
ऑरेंज गेट ते मरिन ड्राइव्ह बोगदा प्रकल्पाच्या भुयारीकरणाला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. भुयारीकरणासाठी आवश्यक असणारे टीबीएम तयार करण्यात आले आहे. 4 डिसेंबरला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत टीबीएम जमिनीखाली उतरवले जाईल. तसेच तीन हात नाका जंक्शन येथे ठाणे वाहतूक सुधारणा प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री करतील.