

मुंबई : महापौरांची व्यापक प्रसिद्धी व जनजागृती करण्यासाठी १ सोशल मीडिया एक्सपोर्ट, १ फोटोग्राफर व १ व्हिडिओग्राफर मिळावा, यासाठी महापौर रितू तावडे यांनी पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना लिहिलेले पत्र महापौरांच्या चांगलेच अंगलट आले आणि मग अशी मागणीच केली नव्हती असे सांगत ती मी नव्हेच, अशी भूमिका त्यांनी घेतली. आता प्रसिद्धीच्या या हव्यासामुळे महापौरच अडचणीत आल्या आहेत.
महापौर पदावर बसल्यापासून रितू तावडे यांचा कार्यकाळ वादग्रस्त ठरतो आहे. महापालिकेने दिलेल्या गाड्यांवर लाल दिवा लावण्याचे प्रयत्न आधी वादात सापडले. नंतर बंगल्याच्या नूतनीकरणावर करोडो रुपये खर्च करण्यावरूनही महापौर चांगल्या अडचणीत आल्या. आता स्वतःच्या प्रसिद्धीसाठी त्यांनी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना लिहिलेले पत्र महापालिकेच्या दप्तरी उपलब्ध आहे.
या पत्रात महापौरांनी १ सोशल मीडिया एक्सपर्ट, १ फोटोग्राफर व १ व्हिडिओ कॅमेरामन नियुक्ती करण्याची मागणी फेब्रुवारी २०२६ मध्ये आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार पालिका आयुक्तांनी महापौरांसाठी सोशल मीडिया एक्सपोर्ट फोटोग्राफर व व्हिडिओ कॅमेरामन नियुक्ती करण्यास मंजुरी दिली. त्यानुसार स्थायी समितीत २५ लाख रुपये खर्चाचा प्रस्तावही सादर करण्यात आला आणि या उधळपट्टीला तोंड फुटले.
विरोधकांनी धारेवर धरताच महापौर तावडे यांनी आपण अशी मागणीच केली नसल्याचे सांगत जनसंपर्क विभागावर खापर फोडण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर जनसंपर्क खात्याची जबाबदारी दोन सहाय्यक आयुक्तांकडे सोपवण्याची मागणीही केली आहे.
महापौरांना निविदांची माहिती हवी
महापौर म्हणाल्या, उपक्रम, योजना या विविध समिति, स्थायी समिती यांच्यासमोर सादर झाल्यानंतर, प्रसारमाध्यमे त्याचा संबंध थेट माझ्याशी जोडतात. त्यामुळे महापौरांशी संबंधित कोणतीही कामे, प्रकल्प, योजना प्रस्तावित असल्यास, त्याची मान्यता, अंदाजपत्रक व निविदा प्रक्रीया याबाबत मला आधी माहिती मिळावी. त्याशिवाय असे प्रस्ताव स्थायी व अन्य समितीसमोर आणू नयेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे. त्यामुळे महापौर अजूनच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
महापौरांच्या ‘रील’साठी लाखो रुपये कशाला?
महापालिका ही मुंबईकरांच्या करातून चालते. या पैशांचा वापर नागरिकांच्या मूलभूत सुविधा, पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक सेवांसाठी होणे अपेक्षित आहे. मात्र महापौर कुठे गेल्या, कोणाला भेटल्या, कुठे बसल्या, काय पाहिले याच्या 'रील' आणि समाजमाध्यम प्रसिद्धीसाठी लाखो रुपये खर्च केले जात असतील, तर हा मुंबईकरांच्या पैशांचा उघड अपव्यय असल्याची टीका किशोरी पेडणेकर यांनी केली. महापौरांच्या प्रसिद्धीसाठी वर्षाला ४० ते ४५ लाख रुपये खर्च करणार असतील, तर ही प्रसिद्धी आहे की मुंबईकरांच्या तिजोरीची लूट? असा संतप्त सवाल त्यांनी केला. भाजपची तीन तिघाडी आणि कारभार बिघाडी अशी अवस्था आहे. स्थायी समिती काय बोलते ते सभागृह नेत्याला माहिती नाही, सभागृह नेता काय बोलतो ते महापौरांना माहिती नाही आणि महापौर काय बोलतात ते प्रशासनालाही माहिती नाही, अशा शब्दांत किशोरी पेडणेकर यांनी सत्ताधारी भाजपच्या कारभाराची खिल्ली उडवली.