

मुंबई : विधानसभेप्रमाणे मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौरपदाच्या निवडणुकीसाठी 114 नगरसेवकांच्या पाठिंबाच्या मॅजिक फिगरची गरज नाही. महापौरपदासाठी उभ्या राहणाऱ्या कोणत्याही पक्षाच्या ज्या उमेदवाराला जास्त मते, तो महापौर बनतो.
मुंबईतील 227 प्रभागांपैकी 114 प्रभागांत ज्या पक्षाचे नगरसेवक निवडून येतात तो पक्ष महापालिकेत बहुमतात असतो असे समजले जाते. यावेळी मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये भाजप-शिवसेना पक्षाचे 118 नगरसेवक निवडून आले आहेत. यात भाजपाचे सर्वाधिक 89 नगरसेवक असून दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना ठाकरे गटाचे 55 नगरसेवक आहेत. तिसऱ्या क्रमांकावर शिवसेना असून त्यांचे 29 नगरसेवक निवडून आले आहेत.
चौथ्या क्रमांकावर 24 नगरसेवक असलेली काँग्रेस असून पाचव्या क्रमांकावर एमआयएमचे आठ, तर मनसेचे सहा नगरसेवक आहेत. सर्वांत मोठा पक्ष म्हणून महायुतीमार्फत महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येईल. या विरोधात विरोधक आपला उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात. हे दोन्ही अर्ज पहिल्या महापालिका सभागृहात पीठासीन अधिकाऱ्यांकडे दाखल झाल्यानंतर महापौरपदाची निवडणूक प्रक्रिया पार पडते.
महापौरपदासाठी असलेल्या उमेदवारांची नावे पीठासीन अधिकारी जाहीर करतात. त्यानंतर मतदान प्रक्रिया पार पाडली जाते. महापौर पदाची निवडणूक हातवर करून पार पाडली जाते. पीठासीन अधिकारी महापौर पदासाठी उभे असलेल्या उमेदवारांची नावे घेतल्यानंतर अनुकूल म्हटल्यानंतर जास्तीत जास्त हात ज्या नगरसेवकांचे वर होतील त्यांची नोंद घेतली जाते. प्रतिकूल साठीही ज्या नगरसेवकांनी हात वर केले त्यांची नोंद घेतली जाते. त्यानंतर प्रत्येक नगरसेवकांनी दिलेल्या मताची कागदावर नोंद केली जाते. ही प्रक्रिया पार पाडत असताना पूर्णपणे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जाते.
अगदी कोणता नगरसेवक कुठे सही करतो याचीही नोंद केली जाते. ही सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर कोणत्या उमेदवाराला किती नगरसेवकांनी मतदान केले याची मोजणी होऊन, निकाल जाहीर करण्यात येतो. या प्रक्रियेत ज्या नगरसेवकाला जास्त मते तो महापौर घोषित करण्यात येतो. यासाठी 114 मते पडायला हवीत असे नाही. एखाद्या उमेदवाराला 90 मते मिळाली. व दुसऱ्याला 91 मते मिळाली. तर 91 मते मिळालेल्या उमेदवार महापौर होऊ शकतो. मग तो सर्वाधिक नगरसेवक असलेल्या पक्षाचा असो अथवा कमी नगरसेवक निवडून आलेल्या पक्षाचा असो. तो महापौर होऊ शकतो.