मुंबई: नैऋत्य मोसमी वारे अरबी समुद्रात मंदावल्याने आणि ‘अल निनो’च्या प्रभावामुळे महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन लांबणीवर पडले असून, तो मुंबईसह उर्वरित राज्यात दाखल होण्यासाठी २० जूनपर्यंत वाट पाहावी लागेल, असा नवा अंदाज भारतीय हवामान विभागाने रविवारी व्यक्त केला.
कोकण किनारपट्टीवर मान्सूनचा प्रवाह अधिक तीव्र करण्यासाठी बंगालच्या उपसागरात मध्य आणि उत्तर भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणे हा सर्वात महत्त्वाचा घटक असतो. मात्र, २० जूनपर्यंत असा कोणताही पट्टा निर्माण होण्याची शक्यता नाही आणि हा काळ आणखीही पुढे वाढू शकतो.
अरबी समुद्राच्या शाखेने महाराष्ट्रात आलेला मान्सून दहा दिवसांपासून अडखळला आहे. या पार्श्वभूमीवर, बंगालच्या उपसागरातील पूर्वोत्तर भारतात गेलेल्या शाखेने सुसाट प्रगती करीत बिहारमध्ये प्रवेश केला आहे. मान्सून भारतात दोन शाखांद्वारे येतो. पहिल्या शाखेने बंगालच्या उपसागरातून अरबी समुद्र, श्रीलंका आणि केरळ पार करीत पुढे गोवामार्गे महाराष्ट्रात आला. ही शाखा सर्वांत वेगवान आणि लवकर सक्रिय होते. ही शाखा महाराष्ट्रातच अडखळली आहे.
राज्यात असह्य उकाडा
मान्सून मध्य महाराष्ट्रातच अडखळला आहे. उत्तर भारतातील उष्ण वाऱ्यांनी त्याचा प्रवास थांबला. त्यामुळे राज्यात उष्णतेची लाट सक्रिय झाली आहे. विदर्भात पारा पुन्हा ४३ अंशांवर आहे.
मान्सूनच्या हुलकावणीने शेतकरी चिंतेत
यंदा राज्यात पाऊस कमी पडणार असल्याचा अंदाज यापूर्वीच वर्तवण्यात आला. तशातच मान्सूनची वाटचाल संथगतीने सुरू आहे. केरळममध्ये तो दोन दिवस उशिराने म्हणजे ४ जून रोजी दाखल झाला. ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देत शेतीसाठी उपसाबंदी लागू केली आहे. मान्सूनच्या आगमनाची तारीख सतत लांबणीवर पडत असल्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. यामुळे शेतकरी काळजीत पडला आहे.
अफगाणिस्तानने वाट रोखली
अफगाणिस्तानकडून येणाऱ्या गरम व कोरड्या वाऱ्यांमुळे मान्सूनची वाटचाल रोखली गेली असून, या कोरड्या वाऱ्याचा प्रभाव कमी झाला की, मान्सूनच्या पुढील प्रवासाला सुरुवात होणार आहे. मुंबईसह महाराष्ट्राच्या उर्वरित भागामध्ये मान्सून दाखल होण्यासाठी आता थेट २० जून उजाडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.