

Mumbai News
मुंबई: माटुंगा परिसरात दोन लहान मुलांसमोर कारमध्ये घुसून चाकूचा धाक दाखवत लूटण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला एका महिलेच्या धाडसामुळे अखेर नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मुलांच्या सुरक्षेची पर्वा न करता आरोपीला प्रतिकार करत महिलेने आरडाओरडा केल्याने त्याचा डाव फसला.
ही घटना गुरुवारी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास माटुंगा येथील खालसा डॉन बॉस्को परिसरात घडली. संबंधित महिला आपल्या मुलांना फुटबॉलच्या क्लासमधून घेण्यासाठी आली होती. तिने कारचे लॉक उघडून चालकाच्या सीटवर बसताच, आरोपीने मागील दरवाजा उघडून कारमध्ये प्रवेश केला. त्या वेळी तिची दोन्ही मुले मागील सीटवर बसलेली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अली बशारत अली सय्यद (वय ४०) असे आरोपीचे नाव असून, त्याने कारमध्ये प्रवेश करताच चाकू बाहेर काढून मुलांना धमकावले. त्यानंतर महिलेकडे पैसे आणि सोन्याचे दागिने देण्याची मागणी केली. तसेच, आरडाओरडा केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही त्याने दिली. मात्र, महिलेने घाबरून न जाता आरोपीला विरोध केला. तिने मोठ्याने आरडाओरडा सुरू केल्याने आरोपी घाबरला आणि कारमधून बाहेर पडून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला.
महिलेचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. त्यांनी आरोपीचा पाठलाग करून त्याला पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. आरोपीच्या झडतीदरम्यान त्याच्याकडून दोन चाकू जप्त करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.