Mumbai Local Train: मुंबई लोकलमध्ये चक्क चिलम पार्टी! धावत्या ट्रेनमधील व्हिडीओ व्हायरल, प्रवाशांमध्ये संताप

Mumbai Local Train Video Viral: मुंबई लोकलमधील एका व्हायरल व्हिडीओमध्ये दोन जण धावत्या ट्रेनमध्ये चिलम ओढताना दिसत आहेत.
Mumbai Local Train Video Viral
Mumbai Local Train Video ViralPudhari
Published on
Updated on

Mumbai Local Train Video Viral: मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल ट्रेन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी कारण ठरला आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक धक्कादायक व्हिडीओ. या व्हिडीओमध्ये दोन जण भरदिवसा धावत्या मुंबई लोकलमध्ये चिलम ओढताना दिसत असून, या प्रकारामुळे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार पश्चिम रेल्वे मार्गावरील एका लोकल ट्रेनमध्ये घडल्याचा दावा केला जात आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक तरुण आणि एक मध्यमवयीन व्यक्ती उघडपणे चिलम ओढताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्या आसपास इतर प्रवासी असतानाही दोघेही कोणतीही भीती किंवा संकोच न बाळगता धूम्रपान करताना दिसतात.

Mumbai Local Train Video Viral
Mumbai Local Train Video ViralPudhari

व्हिडीओमध्ये सुरुवातीला तरुण चिलम पेटवताना दिसतो. त्यानंतर तो त्यातून झुरका घेतो आणि शेजारी बसलेल्या व्यक्तीकडे चिलम देतो. दोघेही आलटून-पालटून धूम्रपान करत राहतात. हा प्रकार एका सहप्रवाशाने मोबाईलमध्ये कैद केला असून त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

या घटनेनंतर अनेक नेटिझन्सनी संताप व्यक्त केला आहे. मुंबई लोकलसारख्या गर्दीच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन होत असताना रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा नेमकी काय करत आहे, असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, व्हिडीओमध्ये नेमके कोणते पदार्थ सेवन केले जात होते, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. चिलमचा वापर सामान्यतः तंबाखू किंवा गांजासारखे पदार्थ सेवन करण्यासाठी केला जातो. त्यामुळे या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करण्याची मागणीही होत आहे.

या घटनेबाबत रेल्वे सुरक्षा बल (RPF), सरकारी रेल्वे पोलीस (GRP) किंवा पश्चिम रेल्वेकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. तसेच संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे की नाही, याबाबतही माहिती समोर आलेली नाही.

Mumbai Local Train Video Viral
Water Supply Project: गारगाईनंतर आता पिंजाळ प्रकल्पासाठी हालचाली; पुढील अर्थसंकल्पात तरतूद

भारतीय रेल्वे कायद्यानुसार रेल्वे परिसरात किंवा रेल्वे डब्यात धूम्रपान करणे हा दंडनीय गुन्हा आहे. रेल्वे अधिनियम 1989 मधील कलम 167 तसेच सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थ कायदा (COTPA) 2003 अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी आहे. अशा प्रकारच्या उल्लंघनांवर दंड आणि कारावासाची तरतूदही आहे.

Mumbai Local Train Video Viral
Operation Tiger Politics: आपापल्या खासदारांवर आता विरोधी पक्षांची नजर!ऑपेरेशन करण्याची काहींना घाई?

मुंबई लोकलमधील हा व्हिडीओ समोर आल्यानंतर रेल्वे सुरक्षेबाबतची चिंता पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. दररोज लाखो प्रवासी प्रवास करणाऱ्या या व्यवस्थेत अशा घटना रोखण्यासाठी अधिक कडक अंमलबजावणीची गरज असल्याची भावना प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news