

Mumbai local train update
मुंबई: मुसळधार पावसामुळे विस्कळीत झालेली वसई रोड ते विरार दरम्यानची मुंबई उपनगरीय रेल्वे सेवा अखेर पुन्हा पूर्णपणे पूर्ववत करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाने युद्धपातळीवर काम करून ही सेवा सुरळीत केली असून, यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, चर्चगेट–दहाणू रोड दरम्यान धावणाऱ्या सर्व पश्चिम रेल्वे उपनगरीय लोकल सेवा १०–१५ मिनिटे उशिराने धावत आहेत.
पावसाचा जोर वाढल्याने खबरदारीचा उपाय आणि तांत्रिक बिघाडामुळे या मार्गावरील वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आली होती. त्यामुळे नोकरदार आणि दैनंदिन प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल मनःपूर्वक दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच, संकटसमयी प्रवाशांनी दाखवलेला संयम आणि सहकार्याबद्दल त्यांचे आभारही मानले आहेत.
"प्रवाशांची सुरक्षितता हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. वसई रोड-विरार दरम्यानची उपनगरीय सेवा पुन्हा सुरळीत करताना आम्हाला आनंद होत आहे. भविष्यातही प्रवाशांना सुरक्षित, वेळेवर आणि दर्जेदार सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत," अशी प्रतिक्रिया रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. दरम्यान, रेल्वे वाहतूक आता नियमित वेळेनुसार धावत असून सर्व प्रवाशांना सुरक्षित आणि सुखकर प्रवासाचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहरांना अतिवृष्टीमुळे पुराचा वेढा पडला असून राज्यासाठी पुढील ४८ तास अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. हवामान विभागाने ८ जुलैपर्यंत राज्यातील काही भागांना 'रेड अलर्ट' आणि 'ऑरेंज अलर्ट' दिला आहे. मंगळवारी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या मध्यवर्ती भागात तब्बल ३०० मि.मी. पावसासह ढगफुटी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अत्यावश्यक असल्याशिवाय दोन दिवस नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
कोल्हापूर : यलो अलर्ट
ठाणे : ऑरेंज अलर्ट
नाशिक : रेड अलर्ट
रत्नागिरी : ऑरेंज अलर्ट
पुणे : रेड अलर्ट
सातारा : ऑरेंज अलर्ट
पालघर : रेड अलर्ट
अकोला : ऑरेंज अलर्ट
रायगड : रेड अलर्ट
अमरावती : ऑरेंज अलर्ट
मुंबई : ऑरेंज अलर्ट
सिंधुदुर्ग : यलो अलर्ट