

Mumbai Local Train Stabbing Case: मुंबई लोकल ट्रेनमध्ये २२ वर्षीय मयंक लोहार याची चाकूने वार करून हत्या केल्याच्या प्रकरणाला आता नवे वळण लागले आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या ३० वर्षीय रोशन सुवर्णाने जामिनासाठी अर्ज केला आहे. आपण मयंकची हत्या केली नसून, दोघांमधील भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत असताना स्वतः जखमी झालो होतो, असा दावा त्याने केला आहे. प्रत्यक्ष हल्ला करणारा दुसराच व्यक्ती होता आणि तो घटनास्थळावरून पळून गेला, असेही आरोपीचे म्हणणे आहे.
मात्र, मयंकच्या कुटुंबीयांनी आरोपीच्या जामिनाला विरोध केला आहे. आरोपी बाहेर आल्यास आपल्याला आणि या प्रकरणातील साक्षीदारांना धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. या जामीन अर्जावर २० नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
ही घटना २३ जून २०२६ रोजी रात्री घडली होती. अंधेरीहून नालासोपाराच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये हा प्रकार घडला. २२ वर्षीय मयंक लोहार कामावरून घरी परतत होता. त्यावेळी ट्रेनमधील दरवाजाजवळ पावसाचे पाणी अंगावर उडाल्याच्या कारणावरून मयंक आणि एका अनोळखी व्यक्तीमध्ये वाद सुरू झाला.
वाद वाढल्यानंतर काही प्रवाशांनी मध्यस्थी करत दोघांना वेगळे केले. त्यानंतर गोरेगाव आणि मालाडदरम्यान लोकलची साखळी ओढण्यात आली. याचदरम्यान हल्लेखोराने मयंकच्या छातीवर आणि पोटावर चाकूने वार केल्याचा आरोप आहे.
गंभीर जखमी झालेल्या मयंकला तातडीने शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणातील आरोपी रोशन सुवर्णाने न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, मयंक आणि दुसऱ्या एका व्यक्तीमध्ये भांडण सुरू असताना तो मध्यस्थी करण्यासाठी गेला होता. या प्रयत्नात तो स्वतःही जखमी झाला. मात्र, प्रत्यक्ष हल्ला करणारी व्यक्ती पळून गेल्यानंतर पोलिसांनी आपल्यालाच या प्रकरणात गोवले, असा दावा त्याने केला आहे.
रोशन आणि मयंक एकमेकांना ओळखत नव्हते. त्यांच्यात कोणतेही वैर नव्हते. हत्या करण्यामागे कोणतेही कारण किंवा पूर्वनियोजन नव्हते, असेही बचाव पक्षाने म्हटले आहे.
तसेच, पोलिसांना हल्ला केलेला चाकू सापडला नाही आणि सीसीटीव्ही फुटेजमध्येही प्रत्यक्ष चाकूने हल्ला केल्याचे दिसत नाही, असा युक्तिवाद बचाव पक्षाने केला आहे.
मयंकचे वडील रमेश लोहार यांनी वकील प्रिन्स कुमार उपाध्याय यांच्यामार्फत आरोपीच्या जामीन अर्जाला विरोध केला आहे. त्यांनी न्यायालयात हस्तक्षेप अर्ज दाखल करून आरोपीला जामीन देऊ नये, अशी मागणी केली आहे.
अवघ्या २२ वर्षांच्या तरुणाची किरकोळ वादातून भर लोकल ट्रेनमध्ये हत्या करण्यात आली. या घटनेमुळे एका कुटुंबाने आपला मुलगा गमावला आहे, असे कुटुंबीयांनी न्यायालयात म्हटले आहे.
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, मयंककडे कोणतेही शस्त्र नव्हते. त्याने कोणावरही हल्ला केला नव्हता. प्रवाशांनी पहिल्यांदा भांडण सोडवल्यानंतर सुमारे आठ मिनिटांनी रोशन सुवर्णा मयंकजवळ गेला. त्याने आपल्या बॅगेतून चाकू काढला आणि मयंकवर अनेक वार केले. त्यानंतर प्रवाशांना धमकावून तो घटनास्थळावरून पळून गेला, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
आरोपीला तांत्रिक पुराव्यांच्या आधारे शोधून काढण्यात आल्याचे मयंकच्या कुटुंबीयांनी न्यायालयात सांगितले आहे. तसेच, डॉक्टरांनी मयंकच्या शरीरावरील जखमा आणि हल्ल्यात वापरलेल्या शस्त्राचा संबंध स्पष्ट केला आहे. ज्या व्यक्तीकडून चाकू खरेदी करण्यात आला होता, त्या विक्रेत्यानेही आरोपीची ओळख पटवल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. आता २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीत न्यायालय काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.