Navi Mumbai Water Dispute: दोन मंत्र्यांमध्ये ‘मोरबे’चे पाणी पेटले; खारघर-कामोठे नोडसाठी पाणीपुरवठा वाढविण्याची मागणी

दुसरीकडे भाजप आमदार प्रशांत ठाकूर आणि शिवसेनेचे मंत्री गोगावले यांच्यातही मोरबेच्या पाण्यावरुन श्रेयवादाचे पडसाद उमटतील, याबाबत दुमत नाही.
Navi Mumbai Water Dispute
Navi Mumbai Water DisputePudhari
Published on
Updated on

नवी मुंबई: नवी मुंबईतील ऐरोली मतदारसंघाचे भाजपचे आमदार आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी, काही दिवसांसाठी पाणी मागितले तर ठीक, मात्र कुणी कायमचा दावा करून दादागिरी करत असेल तर त्यांची दादागिरी मोडीत काढू, असा दमच भरला होता.

मात्र गुरुवारी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरत शेठ गोगावले हे पनवेल महापालिकेत आल्यावर थेट मंत्री गणेश नाईक यांना लक्ष्य करत नवी मुंबईला पाणी घेऊन जाणारी लाईन पनवेलमधून जाते, असा इशारेवजा खोचक टोला मारला.

या शाब्दिक राजकीय वादामुळे आगामी काळात पनवेल आणि नवी मुंबई 'मोरबे धरणातील ' पाणी पुरवठ्यावरुन भाजप-शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये राजकीय कलगीतुरा पेटणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. तर दुसरीकडे भाजप आमदार प्रशांत ठाकूर आणि शिवसेनेचे मंत्री गोगावले यांच्यातही मोरबेच्या पाण्यावरुन श्रेयवादाचे पडसाद उमटतील, याबाबत दुमत नाही.

Navi Mumbai Water Dispute
Stray Dog QR Code Mumbai: भटक्या कुत्र्यांच्या गळ्यात क्यूआर कोडचे पट्टे!

पनवेल महापालिकेच्या सिडको नोड असलेल्या कामोठे आणि खारघर विभागाला दररोजचा ५७ एमएलडी कोटा पाणी देणे आवश्यक असताना आजमितीस नवी मुंबई महापालिका ४८ एमएलडी एवढाच पाणी पुरवठा करत आहे.

मात्र हा कोटा कमी पडत असून मूळ कोटा असलेला ५७ एमएलडीमध्ये आणखी २० एमएलडी पाणी वाढवून ७८ ते ८० एमएलडी करावे, अशी मागणी पनवेल महापालिकेकडून करण्यात येत आहे. नवी मुंबई महापालिका थेट पनवेल महापालिकेला पाणीपुरवठा करत नसून सिडकोला पाणीपुरवठा करते. सिडकोकडून हे पाणी खारघर आणि कामोठे नोडला पुरवले जाते.

Navi Mumbai Water Dispute
Polytechnic Girls Admission: तंत्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी यंदा ६९ टक्के प्रवेश ग्रामीण भागातील मुलींचे

वाढीव पाण्यासाठी साकडे

आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंत्री गिरीश महाजन यांची नुकतीच भेट घेऊन स्वतंत्र धरणाची मागणी केली. शिवाय नवी मुंबई महापालिकेकडून वाढीव पाणी मिळावे यासाठीही साकडे घातले.

दुसरीकडे नवी मुंबई शहराच्या लोकसंख्येत वाढ होत असून नवी मुंबईलाच पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ येऊ नये यासाठी मंत्री गणेश नाईक यांनी थेट भूमिका घेत पनवेल महापालिकेची काही दिवसांची पाण्याची मागणी असेल तर ठिक आहे, मात्र कायम स्वरूपी पाण्याची मागणी फेटाळून लावली आहे.

पाणीटंचाईवरुन आंदोलन

मोरबे धरणामधील काही पाणी कायमचे पनवेल महापालिकेला मिळावे यासाठी पनवेलचे आमदार, महापौर आणि विरोधी पक्षांनी प्रयत्न सुरु केले आहेत. पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. पनवेल महापालिकेची वाढती लोकसंख्या, सिडकोचे नैना क्षेत्रातील बांधकाम, उलवे, द्रोणागिरीसह सिडको नोडमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.

खारघर, कामोठे, नवीन पनवेल, खांदेश्वर, कळंबोली, उलवे या सिडको नोडमध्ये पाणीटंचाईवरुन आंदोलन करण्यात आले. एमआयडीसी, सिडको आणि नवी मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठ्यावर येथील नागरिकांची तहान भागवली जात आहे.

logo
Pudhari News
pudhari.news