

मुंबई: मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा-मुलुंड दरम्यान ब्लॉक माटुंगा-मुलुंड स्थानकांदरम्यान दोन्ही धीम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. सीएसएमटी येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.३२ या वेळेत सुटणाऱ्या गाड्या 'डाऊन' जलद मार्गावर वळवल्या जातील.
या गाड्या शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील आणि पुढे मुलुंड स्थानकावर पुन्हा 'डाऊन' धीम्या मार्गावर वळवल्या जातील. त्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.
तर ठाणे येथून सकाळी ११.०७ ते दुपारी ३.५१ या वेळेत सुटणाऱ्या 'अप' धीम्या मार्गावरील उपनगरी सेवा मुलुंड स्थानकावर जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला व शीव स्थानकांवर थांबतील आणि पुढे माटुंगा येथे पुन्हा 'अप' धीम्या मार्गावर वळवल्या जातील.
हार्बर रेल्वेवरील ब्लॉक
सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे (डाऊन हार्बर लाईन) दरम्यान सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे ते सीएसएमटी (अप हार्बर लाईन) दरम्यान सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. सीएसएमटी येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेल येथे जाणाऱ्या आणि सीएसएमटी येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ या वेळेत वांद्रे/गोरेगाव येथे जाणाऱ्या 'डाऊन' हार्बर मार्गावरील गाड्या रद्द राहतील.
पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० या वेळेत सीएसएमटीयेथे जाणाऱ्या व गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ या वेळेत सीएसएमटी येथे जाणाऱ्या 'अप' हार्बर मार्गावरील गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
पश्चिम रेल्वेवर वांद्रे आणि गोरेगाव ब्लॉक
वांद्रे आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान सकाळी १०.३० ते दुपारी ३.३० या वेळेत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत पनवेल आणि कुर्ला दरम्यान २० मिनिटांच्या अंतराने विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत.
हार्बर लाईनवरील प्रवाशांना ब्लॉकच्या कालावधीत सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची मुभा असेल. याशिवाय पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट-गोरेगाव-चर्चगेट दरम्यान धावणाऱ्या काही धीम्या लोकल सेवाही ब्लॉकच्या कालावधीत रद्द करण्यात येणार आहेत.