

मुंबई : मुंबई शहराला गेल्या तीन महिन्यात तब्बल ३ लाख ५० हजार दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करण्यात आला. त्यामुळे तलावातील पाण्याची पातळी घसरली असून १ जानेवारी सकाळी ६ वाजेपर्यंत सातही तलावामध्ये ७५ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे.
मुंबई शहराला नाशिक जिल्ह्यातील अप्पर वैतरणा, ठाणे जिल्ह्यातील मोडक सागर, मध्य वैतरणा, तानसा व भातसा या तलावातून पाणीपुरवठा होतो. सध्या शहरात दररोज ३,९५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जात आहे. १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबरपर्यंत सुमारे ३ लाख ५० हजार दशलक्ष लिटर म्हणजेच २५ टक्के पाण्याचा पुरवठा करण्यात आला. त्यामुळे पाणीसाठा ७५ टक्केवर आला आहे. मात्र नाशिक जिल्ह्यातील अप्पर वैतरणा तलावांमध्ये आजही ९६.६० टक्के इतका सर्वाधिक पाणीसाठा आहे. तर मोडक सागर तलावातील पाणीसाठा ५१ टक्केवर आला आहे.
सातही तलावामध्ये सरासरी १४ लाख ४७हजार दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. परंतु १ जानेवारीला आढावा घेतला असता, तलावाच्या पाणलोट क्षेत्रात १० लाख ८८ हजार दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. शहराला दररोज सर्वाधिक १८५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करणाऱ्या भातसा तलावातही ७४.७५ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.