

मुंबई: तलावाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्यामुळे गेल्या ५ दिवसात पाणीसाठ्यात अवघी ०.८७ टक्के वाढ झाली. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची पुन्हा चिंता वाढली आहे. दोन आठवडाभरापूर्वी मुसळधार पावसामुळे जलसाठा ९७ हजार दशलक्ष लिटर्सवरून ७ लाख ३४ हजार दशलक्ष लिटर्सवर पोहचला होता.
मात्र तलाव क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्याने पातळी वाढ खुंटली. १३ जुलैला सात तलावांत ७ लाख २२ हजार ६४९ दशलक्ष लिटर पाणीसाठा होता. १८ जुलैला तो ७ लाख ३४ हजार ८९१ दशलक्ष लिटर पर्यंत पोहचला आहे.
म्हणजेच ५ दिवसात शहराला सुमारे १७ हजार दशलक्ष लिटर्स पाणी पुरवठा करून १२ हजार २४२ दशलक्ष लिटर्स वाढ झाली. शहराला सर्वाधिक १,८०० दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा करणाऱ्या भातसाच्या पाणीसाठ्यात मात्र वाढ होत आहे.
या तलावात १३ जुलैला ३ लाख १९ हजार ६५९ दशलक्ष लिटर्स पाणीसाठा होता. ५ दिवसात ६ हजार दशलक्ष लिटर्स वाढ झाली. तानसाच्या पाणी साठ्यात वाढ होत आहे. मोडक सागर तलावात मात्र ४ हजार दशलक्ष लिटर्स घट झाली आहे. तर नाशिक जिल्ह्यातील अपर वैतरणा तलावातील पाणी साठ्यात वाढ होत आहे.