

9 lakh Women Benefit Scam
मुंबई : राज्य सरकारी सेवेतील अडीच हजार महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेतल्याचे उघडकीस आल्यानंतर आता 8 लाख 82 हजार 500 महिलांनी चुकीच्या मार्गाने नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे.
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणार्यांमध्ये वर्ग 3 आणि वर्ग 4 च्या कर्मचार्यांचा अधिक समावेश आहे. त्यामुळे याशिवाय, सहा लाखांहून अधिक कर्मचार्यांची आणखी तपासणी करण्यात येणार आहे. तसेच नमो शेतकरी आणि ‘लाडकी बहीण योजना’ या दोन्ही योजनांचा काहींनी लाभ घेतल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे, अशी माहिती महिला व बालविकास विभागातील एका अधिकार्याने दिली.
शासकीय योजनांचा सरकारी कर्मचार्यांना लाभ घेता येत नाही, असे शासन निर्णयात स्पष्ट असतानाही अनेकांनी अनधिकृतपणे पैसे उचलले आहेत. त्यामुळे शासनाकडून लाभार्थ्यांवर लक्ष ठेवले जात आहे. दोषी आढळणार्यांवर कारवाईची शक्यताही या अधिकार्याने व्यक्त केली आहे.
दरम्यान, लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याचा हप्ता लवकरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होईल. या योजनेबाबत अनेक गैरसमज पसरवले जात आहेत. मात्र, ही योजना सुरूच राहील.
सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात यापुढेही रक्कम जमा होत राहील, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली.
महिला आयोगाच्या कार्यपद्धतीच्या बैठकीसंदर्भात तटकरे म्हणाल्या, महिला आयोगासंदर्भातील बैठकीला काहींना निमंत्रित करता आले नाही. आजच्या बैठकीतून काही सूचना येतील त्यावर कार्यवाही करू. महिला आयोगाच्या मर्यादा लक्षात घेणे गरजेचे आहे. सूचनांचा विचार नक्की करू.