

Ajit Pawar on Ladki Bahin Yojana
पुणे: ‘लाडकी बहीण’ योजना सुरू करताना निकष तपासण्यासाठी पुरेसा कालावधी न मिळाल्याने सरकारी नोकरी असलेले, घरी कार असलेले आणि अडीच लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेले लाभार्थीही या योजनेचा लाभ घेऊ शकले.
हा लाभ घेतलेल्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. मात्र, आता अपात्र लाभार्थ्यांना योजनेतून वगळण्यात येत आहे. सरसकट सर्वांना लाभ देणे ही चूकच झाली, अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. सिंचननगरमध्ये आयोजित पुणे कृषी हॅकेथॉनच्या उद्घाटनानंतर ते माध्यमांशी बोलत होते. (Latest Pune News)
पवार म्हणाले की, लाडकी बहीण योजना सुरू करताना सरकारकडे खूप कमी वेळ होता. दोन-तीन महिन्यांत निवडणुका होत्या. त्या वेळी निकष तपासण्यासाठी जेवढा वेळ हवा होता तेवढा मिळाला नाही. वार्षिक अडीच लाखांच्या आत उत्पन्न असणार्यांना या योजनेचा लाभ द्यायचे ठरले होते. निकषात बसणार्यांना अर्ज करण्याचे आवाहन केले होते.
तेव्हा वाटले की, या निकषात न बसणारे अर्ज करणार नाहीत, मागणी करणार नाहीत. मात्र, काही जणांनी अर्ज केले आणि लाभ घेतला. दिलेले पैसे काढून घेण्याचा प्रश्नच येत नाही. आता त्याची व्यवस्थित माहिती घेऊन, खरोखरच ज्या लाभार्थ्यांना लाभ मिळायला पाहिजे, त्याच लाभार्थ्यांना ही योजना सुरू ठेवली जाणार आहे.
घरी कार असणार्या काही केसेस समोर येत आहेत. सरकारी कर्मचार्यांवर कारवाई करणार नाही. सरसकट सर्वांना योजनेचा लाभ देणे ही आमची चूक झाली, हे मान्य आहे. राष्ट्रवादी एकत्र येणार का? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत, अशी चर्चा सुरू असल्याबद्दल विचारले असता, त्यांनी उत्तर देण्याचे टाळले.