Mumbai Crime | कुर्ल्यात सहा महिन्यांत पवार कुटुंबातील दुसरी हत्या: संतप्त नातेवाइकांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन

हलाव पूल परिसरात विनोद पवार यांच्यावर तीन गोळ्या झाडून हत्या; तपासासाठी १२ पथके तैनात
Kurla Firing Incident
Kurla Firing IncidentPudhari
Published on: 
Updated on: 

Kurla Firing Incident

मुंबई : कुर्ल्यातील हलाव पूल परिसरात बुधवारी भरदिवसा गोळीबार करून विनोद मल्लप्पा पवार (वय ४०) यांची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, सहा महिन्यांच्या कालावधीत पवार कुटुंबातील ही दुसरी हत्या असल्याने खळबळ अधिकच वाढली आहे. या घटनेच्या निषेधार्थ संतप्त पवार कुटुंबीयांनी विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी पोलीस ठाण्यात आणलेल्या संशयित आरोपीला मारहाण करण्याचाही प्रयत्न झाला. दरम्यान, या हत्येचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी १२ तपास पथके तयार केली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कुर्ल्यातील हलाव पूल परिसरातील सार्वजनिक शौचालयाजवळ बुधवारी विनोद पवार आले होते. यावेळी दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. आरोपींनी त्यांच्यावर तीन राऊंड गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात विनोद गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने कुर्ला येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Kurla Firing Incident
Kalyan Crime | कल्याण तालुका हादरला; टिटवाळ्याजवळ मालमत्तेच्या वादातून वडिल-भावावर गोळीबार

कौटुंबिक वर्चस्वाच्या वादातून हत्या झाल्याचा संशय

या हत्येमागे पवार कुटुंबातील अंतर्गत वाद असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. कुर्ल्यातील माकडवाला कंपाउंड परिसरात राहणाऱ्या पवार कुटुंबात दोन गट असून, त्यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून वर्चस्वावरून संघर्ष सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. याच वादातून सहा महिन्यांपूर्वी विनोद पवार यांचे मोठे बंधू बाबा पवार यांचीही गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. आता विनोद पवार यांचाही गोळीबारात मृत्यू झाल्याने एकाच कुटुंबातील दोन भावांची हत्या झाल्याची घटना चर्चेचा विषय ठरली आहे.

संतप्त नातेवाइकांचे पोलीस ठाण्यासमोर आंदोलन

एकाच कुटुंबातील दोन भावांची हत्या झाल्याने पवार कुटुंबीयांचा संताप अनावर झाला. विनोद पवार यांच्या हत्येप्रकरणी आरोपींना तातडीने अटक करून न्याय मिळावा, या मागणीसाठी कुटुंबीयांनी विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. याचदरम्यान पोलिसांनी एका संशयिताला पोलीस ठाण्यात आणले असता संतप्त नातेवाइकांनी त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका कुटुंबीयांनी घेतली.

Kurla Firing Incident
Crime News: कुर्ल्यात जुन्या वादातून अंदाधुंद गोळीबार.. ६ महिन्यापूर्वी भावालाही असंच संपवलं होतं

तपासासाठी पोलिसांची १२ पथके

गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अप्पर पोलीस आयुक्त धनंजय कुलकर्णी, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची पाहणी करून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. या प्रकरणाचा तपास वेगाने करण्यासाठी पोलिसांनी तब्बल १२ पथके तयार केली असून, एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. इतर संशयित आरोपींचा शोध सुरू आहे.

दोन्ही गटांची गुन्हेगारी पार्श्वभूमी

दरम्यान, पवार कुटुंबातील दोन्ही गटांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती समोर आली आहे. मृत विनोद पवार यांच्याविरुद्धही यापूर्वी हत्येचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे या हत्येमागे नेमके कोणते वैमनस्य आहे, गोळीबार करणारे दोन्ही हल्लेखोर कोण आहेत आणि सहा महिन्यांपूर्वी झालेल्या बाबा पवार यांच्या हत्येचा सध्याच्या घटनेशी काही संबंध आहे का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिसांच्या १२ तपास पथकांकडून या सर्व बाबींचा तपास सुरू असून, या प्रकरणातील नेमके कारण तपासातून स्पष्ट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.