

कुर्ला येथील हलावपूल जवळ विनोद मल्लप्पा पवार (४०) याच्यावर गोळीबार करून त्याची हत्या करण्यात आली आहे. सहाच महिन्यांपूर्वी विनोद चा मोठा भाऊ बाबा पवार याची देखील अश्याच प्रकारे गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यासमोर पवार कुटुंबाने ठिय्या आंदोलन केले.
कुर्ल्याच्या माकडवाला कंपाउंड मध्ये हे पवार कुटुंब राहते. त्यांच्याच कुटुंबात दोन गट असून त्यांच्यात वर्चस्वाची लढाई अनेक वर्षांपासून सुरू आहे. याच वादातून सहा महिन्यांपूर्वी बाबा पवारची गोळ्या घालून दुसऱ्या गटाने हत्या केली होती.
बुधवार दि ११ रोजी बाबा पवारचा भाऊ विनोद पवार हा शौचालयाला हलाव पूल येथील शौचालयाजवळ आला असता दोन ते तीन आरोपींनी त्याच्यावर तीन राऊंड गोळ्या झाडल्या. जखमी अवस्थेत त्याला कुर्ला येथील पालिकेच्या भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
घटनास्थळी अप्पर पोलीस आयुक्त धनंजय कुलकर्णी, उपायुक्त गणेश शिंदे आणि विविध विभागाचे पोलीस अधिकारी दाखल झाले. फॉरेन्सिक टीम ने देखील घटनास्थळी दाखल होत पुरावे गोळा केले. मात्र संध्याकाळी उशिरा पर्यंत यातील आरोपी फरार होते. या प्रकरणी तपास व्हीबी नगर पोलीस तपास करीत असून पूर्व वैमन्यस्यातूनच ही हत्या झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.