

Nurse injured KEM hospital Mumbai
मुंबई : परळ येथील केईएम रुग्णालय येथे उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर हल्ला चढविल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि.२८) पहाटे घडली. या घटनेत एक नर्स गंभीर जखमी झाली असून दोन सुरक्षा रक्षकांनाही मारहाण करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश कोणेकर हा रुग्ण उपचारासाठी दाखल असताना आज पहाटे सुमारे पाच वाजता त्याचा मृत्यू झाला. यानंतर संतप्त झालेल्या सुमारे २० ते २५ नातेवाईकांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर राग काढत बेदम मारहाण केली. या हल्ल्यात एका नर्सला गंभीर दुखापत झाली असून तिला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेच्या निषेधार्थ रुग्णालयातील नर्सेस व इतर कर्मचारी यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. सकाळपासून रुग्णालयाबाहेर आंदोलन सुरू असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच महिला कर्मचाऱ्यांना पुरेशी सुरक्षा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
दरम्यान, रुग्णालयात पुरेशा सुरक्षेचा अभाव असल्यामुळेच अशा घटना वारंवार घडत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. रुग्णालय प्रशासन आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या निष्काळजीपणामुळेच कर्मचाऱ्यांचे जीव धोक्यात येत असल्याची टीका होत आहे.
या प्रकारामुळे रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, अशा घटनांना आळा घालण्यासाठी तातडीने कठोर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.