

गोरेगाव : मालाड पश्चिम येथील मालवणी चर्चजवळील सिंग कंपाऊंडमागील रिकाम्या जागेत मोठ्या प्रमाणात अवैध डेब्रिज भराव सुरू असून परिसराची पर्यावरणीय हानी वेगाने वाढत आहे. मागील काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या या गैरप्रकारामुळे जागेतील हिरवळ नष्ट होत आहे तसेच धुळीचे प्रमाणही वाढले आहे.
12 नोव्हेंबर रोजी स्थानिक समाजसेवक सम्राट बागुल यांनी एक डेब्रिज वाहन रोखून संबंधितांवर कडक कारवाईची मागणी केली होती. मात्र या हस्तक्षेपानंतर त्यांना धमक्या मिळाल्याचे समोर येत आहे. स्थानिकांच्या मते, आरोपी प्रवीण नलावडे हे पदाचा प्रभाव वापरून अवैध प्रकारांना उघडपणे संरक्षण देत आहेत. पोलीस आणि मनपा पी/उत्तर विभागाकडे वारंवार तक्रारी नोंदवल्यानंतरही ठोस निर्णय न घेतल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. महानगरपालिकेच्या तीन निगरानी पथकांपैकी एकही पथक प्रत्यक्ष कारवाई करत नसल्याचा आरोपही करण्यात येत आहे. स्थानिक संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणात तातडीने गुन्हा नोंदवून डेब्रिज माफियांवर कडक उपाययोजना राबवण्याची मागणी पुन्हा एकदा जोरदारपणे केली आहे.