

मुंबई ः मधुमेहाच्या रुग्णांमध्ये सरासरी 20 ते 25 टक्के रुग्णांना डायबेटिक फूट हा आजार असतो. परिणाम म्हणून अनेकदा रुग्णांचा पाय कापावा लागतो. मात्र, डायबेटिक फूटवर प्रतिबंधात्मक उपाय व्हावे यासाठी जे. जे. रुग्णालयात फूट केअर क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. सरकारी रुग्णालयात पहिल्यांदाच अशा प्रकारचे क्लिनिक सुरू करण्यात आले असून याचा मोफत फायदा गोरगरिबांना होणार आहे.
मधुमेही रुग्णांमध्ये पायाची संवेदना कमी होणे, रक्तपुरवठा घटणे आणि संसर्गाचा धोका वाढणे या तिन्ही कारणांमुळे किरकोळ जखमही मोठी बनते व पुढे पाय कापण्याची वेळ येऊ शकते. हे थांबवण्यासाठी शल्यचिकित्सा विभागाने स्वतंत्र ‘डायबेटिक फूट केअर क्लिनिक’ सुरू केले आहे. या उपक्रमाचे नेतृत्व शल्यचिकित्सा विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. श्रद्धा अभिजीत धेंडे करत आहेत. प्राध्यापक डॉ. गिरीश बक्षी आणि अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार यांच्या मार्गदर्शनाखाली अत्याधुनिक उपचार आणि प्रतिबंधात्मक सेवा रुग्णांना देण्यात येत आहेत.