

AI Training ITI
मुंबई : डोक्यावर हेल्मेट, वेल्डिंग मशीन हातात अशा पारंपरिक ट्रेड बरोबरच आता राज्यातील आयटीआयचे विद्यार्थी ‘कोडिंग’ करणार आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), ऑटोमेशन, ग्रीन हायड्रोजन एनर्जी, सायबर सुरक्षा, सर्क्युलर इकॉनॉमी, अक्षय ऊर्जा आणि डिजिटल कौशल्यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या शिक्षणासाठी ते सज्ज होणार आहेत.
कौशल्य व उद्योजगता विकास विभागाने सार्वजनिक-खासगी भागीदारीद्वारे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे अद्ययावतीकरण केले आहे. याअंतर्गत खासगी उद्योग व कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) निधीच्या माध्यमातून शासकीय आयटीआय संस्थांचे पायाभूत सुविधांपासून अभ्यासक्रमांपर्यंत संपूर्ण रुपांतर करण्यात येणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णय नुकताच जारी केला आहे.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार आयटीआयमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता , अॅटोमेशन, सायबर सुरक्षा, ग्रीन हायड्रोजन एनर्जी, सर्क्युलर इकॉनॉमी, अक्षय ऊर्जा, डिजिटल कौशल्ये यांसारखे आधुनिक अभ्यासक्रम शिकवले जाणार आहेत. यामुळे प्रशिक्षणार्थ्यांना नवे कौशल्य मिळेल, नवे रोजगार उघडतील, तसेच उद्योगांना कुशल मनुष्यबळ सहज उपलब्ध होईल.
नवीन अभ्यासक्रमांची अंमलबजावणी : कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑटोमेशन, सायबर सुरक्षा, ग्रीन हायड्रोजन एनर्जी, सर्क्युलर इकॉनॉमी, डिजिटल कौशल्ये हे विषय नव्याने शिकवले जाणार आहेत. याशिवाय कोअर इंजिनिअरिंगशी संबंधित प्रगत अभ्यासक्रम शिकवले जाणार आहेत.
उद्योग-प्रणीत शिक्षण : प्रशिक्षण हे उद्योगांशी सुसंगत असेल. किमान 80 टक्के प्रशिक्षणार्थ्यांना अॅप्रेंटिसशिप आणि 20 टक्के विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळवून देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
प्रशिक्षणपद्धतीत बदल : प्रत्येक आयटीआयमध्ये प्लेसमेंट सेल, जॉब पोर्टल जोडणी, इंटर्नशिपचे मार्गदर्शन, डिजिटल लर्निंगचे प्लॅटफॉर्म, आधुनिक प्रायोगिक प्रयोगशाळा अशा गोष्टींचा समावेश.
अध्यापकांचे सक्षमीकरण : सर्व प्रशिक्षकांना उद्योग तज्ज्ञांकडून आधुनिक विषयांवरील प्रशिक्षण.
गतवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रीशियन, मेकॅनिक डिझेल, फिटर, वेल्डर, वायरमन आदी अभ्यासक्रमांना पसंती दर्शवली आहे. दहावीला 90 टक्केहून अधिक गुण मिळवलेल्या बहुतांश विद्यार्थ्यांनी आयटीआयमधील हे ट्रेड निवडले होते. संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट, मशिनिस्ट डिझेल, मोटर मॅकेनिक, इलेक्ट्रॉनिक्स मशिनिस्ट आदी अभ्यासक्रमांना विद्यार्थी प्राधान्य दिले. 1 लाख 21 हजार विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेतले होते.
* राज्यात 419 आयटीआय, सुमारे 1.25 लाख जागा
* पीपीपी मॉडेलद्वारे खाजगी उद्योगांचा सहभाग
* 80 टक्के प्रशिक्षणार्थ्यांना अॅप्रेंटिसशिपचा अनुभव मिळविणे हे लक्ष्य
* जागतिक दर्जाची कौशल्य केंद्रे उभारणार
* प्लेसमेंट सेल, इंटर्नशिप, डिजिटल लर्निंग, स्मार्ट क्लासरूम्स
* जागतिक बँक सहाय्यक प्रकल्पांच्या माध्यमातून निधी
* ‘रेडी द टीचर’ अभियान, मॉडेल करिअर सेंटर अशी पूरक उपक्रम