मुंबई : निवासी डॉक्टरांच्या कामबंद आंदोलनाचा मुंबईतील रुग्णसेवेवर पहिल्याच दिवशी परिणाम दिसून आला. प्रमुख रुग्णालयांतील रोजची ओपीडी 3 ते 5 हजार असते. हे प्रमाण सोमवारी निम्म्यावर आले होते.
प्रसूती, रुग्णांना दाखल करून घेणे, शव विच्छेदन आदी रुग्णसेवेवर परिणाम दिसून आला. मंगळवारी हा परिणाम अधिक गडद होण्याची चिन्हे आहेत. फलटणमधील एका महिला डॉक्टरच्या जीवन संपवण्यामुळे संतप्त झालेल्या राज्यातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमधील 10,000 निवासी डॉक्टर सोमवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. सोमवारी मुंबईतील निवासी डॉक्टरांनी काम बंद करीत या घटनेचा निषेध केला.
मुंबईत महापालिका व शासकीय रुग्णालयांत दररोज पाच हजारांपर्यंत रुग्णांची बाह्यतपासणी होत असते. मात्र सोमवारी तपासणीसाठी डॉक्टरच उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना ताटकळत बसावे लागले. त्यामुळे रुग्णालयांत रांगा लागल्या होत्या. डॉक्टर उपलब्ध न झाल्याने त्यांना तपासणी न करताच परत जावे लागले.
प्रसूतीसाठी आलेल्या रुग्णांनाही याचा फटका बसला. नायर आणि सायन रुग्णालयात हा परिणाम अधिक दिसून आला. नायर रुग्णालयात दररोज तेराशेच्या घरात होणारी ओपीडी सोमवारी फक्त 406 इतकी झाली तर सायन रुग्णालयात दोन हजार होणारी ओपीडी 1,020 एवढीच झाली.
सोमवारी, डॉक्टर आणि अधिकाऱ्यांसह संघटनेचे सदस्य प्रशासकीय काम आणि बैठकांवर बहिष्कार टाकतील. त्यांनी असेही सांगितले की, खाजगी रुग्णालये आणि क्लिनिकमधील बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) 7 ते 13 नोव्हेंबरपर्यंत बंद राहतील. जर सरकारने अद्याप योग्य कारवाई केली नाही, तर 14 नोव्हेंबरपासून राज्यातील आरोग्य सेवा बंद केल्या जाणार आहेत.
डॉ. संतोष कद, अध्यक्ष, आयएमए