नवी मुंबई : राजेंद्र पाटील
सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी राज्य सरकार सकारत्मक असले तरी त्यावर निर्णय घेण्यासाठीच्या बैठकीला मुहूर्त काही मिळत नाही. सोमवारी सह्याद्री या शासकीय अतिथीगृहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेली बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (शरद पवार गट) आमदार शशिकांत शिंदे यांनी आश्वासन समितीला आश्वासन देऊन बैठक का होत नाही, असा प्रश्न उपस्थित करत याबाबतचे पत्र उपमुख्यमंत्री शिंदे यांना पाठवल्याची माहिती आमदार शशिकांत शिंदे यांनी पुढारीशी बोलताना दिली.
सिडकोच्या घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. त्या कमी करण्यासाठी सिडकोला आणि राज्य सरकारला अनेकदा निवेदने दिली गेली. लॉटरी लागलेल्या सोडतधारकांनी म्हाडापेक्षा सिडकोच्या घरांचे चढे दर पाहता सदनिका नाकारली. प्रत्यक्षात आलेले अर्ज, लॉटरी लागलेले अर्जदार, सिडकोत पहिल्या टप्प्याची रक्कम भरणा करणारे सोडतधारक आणि सिडकोला पत्र देऊन सदनिका नको सांगणारे सोडतधारक यांचा आकडा पाहिल्यास प्रचंड मोठा आहे.
विशेष म्हणजे आतापर्यंत सिडकोने घरे बांधली आणि विक्रीही स्वत:च केली. मात्र आता एका एजन्सीमार्फत घरांची विक्री करण्यासाठी नियुक्ती केली आहे. या एजन्सीने केलेल्या कामाचा लेखाजोखा पाहता सिडकोची घरे हातोहात विकली जायला हवी होती. मात्र उलट लॉटरी लागलेले घर परत करण्याची वेळ आली आहे. एजन्सीने केवळ कोट्यवधी रुपयांचे कागदी घोडे नाचवले.
राज्य सरकारने चारवेळा किमती घटवण्यासंर्दभात बैठका बोलवल्या. मात्र एकदा माझ्यामुळे आणि तीनवेळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काही महत्वाचे काम लागल्याने बैठका रद्द झाल्याची माहिती शशिकांत शिंदे यांनी दिली. पुढे ही बैठक कधी होईल, याबाबतची तारीख अद्यापपर्यंत मिळालेली नाही. त्यामुळे आजच राज्य सरकारच्या आश्वासन समितीकडे आपण अर्ज पाठवला, असे त्यांनी सांगितले.
आश्वासने देऊन बैठक होत नसल्याचे म्हटले आहे. अधिवेशनाआधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठक घेऊन सिडकोच्या घरांच्या किमती कमी करतील अशी अपेक्षा आहे. सोडतधारकांना दिलासा मिळेपर्यंत हा लढा सुरू राहणार असल्याचे शशिकांत शिंदे यांनी पुढारीला सांगितले.ं