

Brihanmumbai Municipal Corporation Home Sales
मुंबई : ऑगस्ट २०२५ मध्ये मुंबईच्या मालमत्ता बाजारपेठेने ११ हजार नोंदणींचा टप्पा ओलांडला. मात्र जुलैच्या तुलनेत यावेळी गृहविक्रीत घट दिसून आली. बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीत ऑगस्टमध्ये ११ हजार २३० मालमत्ता नोंदणी झाल्या.
ऑगस्ट २०२४ मधील ११ हजार ६३१ नोंदणींच्या तुलनेत यावर्षी ३ टक्के इतकी घट झाली. जुलै २०२५च्या तुलनेत मात्र ही घट ११ टक्के इतकी मोठी आहे. या महिन्यात १२ हजार ५७९ नव्या मालमत्तांची नोंदणी झाली होती.
ऑगस्ट २०२५ मध्ये निवासी व्यवहारांनी मुंबईच्या मालमत्ता बाजारात आघाडी घेतली, एकूण नोंदणींपैकी ८० टक्के वाटा निवासी मालमत्तांचा आहे. १ हजार चौरस फुटांपर्यंतची घरे सर्वाधिक पसंतीस उतरली असून, एकूण नोंदणींपैकी त्यांचा वाटा ८५ टक्के आहे. मोठ्या घरांची मागणीही हळूहळू वाढत असून १ हजार ते २ हजार चौरस फुटांच्या घरांचा वाटा १३ टक्के आहे, तर त्यापेक्षा मोठ्या घरांचा वाटा ३ टक्क्यांवर स्थिर आहे. नाइट फ्रैंक इंडियाने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
अहवालातील विश्लेषणानुसार आलिशान घरांच्या मागणीत वाढ होत आहे. ५ कोटींपेक्षा जास्त किंमतीची घरे एकूण नोंदणींपैकी ६ टक्के आहेत, जे मागील वर्षाच्या ५ टक्केपेक्षा जास्त आहे. याउलट १ ते ५ कोटींच्या मध्यम किमतींच्या विभागात किंचित ३ टक्के घट दिसून आली आहे. ऑगस्ट महिन्यातील एकूण नोंदणींपैकी ८६ टक्के मागणी उपनगरांतून आली. पश्चिम उपनगराचा वाटा ५४ टक्के, मध्य उपनगराचा वाटा ३२ टक्के तर दक्षिण मुंबईचा वाटा ७ टक्के आहे.
दर महिन्याला ११ हजारांपेक्षा अधिक नोंदणी सातत्याने होत राहणे हे मुंबईतील घरांची मागणी स्थिर आणि टिकाऊ असल्याचे द्योतक आहे. अल्प प्रमाणातील मासिक चढ-उतार असूनही, बाजाराने उल्लेखनीय स्थिरता दाखवली आहे, जी वापरकर्त्यांच्या मोठ्या सहभागामुळे आणि मालमत्तेवरील दीर्घकालीन विश्वासामुळे शक्य झाली आहे.
प्रशांत शर्मा, अध्यक्ष, नरेडको महाराष्ट्र