

मुंबई : काही वर्षांपूर्वी ३१ लाख रुपये किंमतीच्या घरांसाठी सोडत जिंकलेल्या विजेत्यांना यावर्षी ५२ लाख रुपये मोजून घर घ्यावे लागणार होते; मात्र १५६ विजेत्यांच्या विरोधानंतर आता म्हाडाने किंमतीवरून माघार घेतली आहे. चितळसर मानपाडा येथील घरांसाठी म्हाडाच्या कोकण मंडळाने २००० साली काढलेल्या सोडतीतील हे विजेते आहेत.
चितळसर, मानपाडा येथे २००० साली म्हाडाच्या कोकण मंडळाने भूखंडांच्या विक्रीसाठी सोडत काढली होती त्यावेळी जवळपास ३ लाखांत भूखंड दिले जाणार होते. या सोडतीत ६०० जण विजेते ठरले होते. भूखंडांचे क्षेत्रफळ ३५ चौरस मीटर ते ७५ चौरस मीटर होते. त्यानंतर हे भूखंड वनविभागाच्या जमिनीवर असल्याने न्यायालयीन वाद सुरू झाला. याचा परिणाम म्हणून योजना रद्द करण्यात आली; मात्र १८१ विजेत्यांनी भरलेली १० हजार रुपये अनामत रक्कम म्हाडाकडेच राहिली.
कालांतराने म्हाडाने विकासक नेमून या भूखंडांवर इमारत उभी केली. २०१८ साली व २०२१ साली विजेत्यांना घर घेण्यासाठी कागदपत्रे जमा करण्यास सांगण्यात आले. २०२१ साली विजेत्यांना देण्यात आलेल्या माहितीनुसार ३१ लाख ४७हजार ९८८ रुपये इतकी प्रत्येक घराची किंमत होती. तसेच घरांचे क्षेत्रफळ ३१.७७ चौरस मीटरपर्यंत कमी करण्यात आले होते. यावर्षी जुलै महिन्यात कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांच्यासोबत बैठक झाली असता घराची किंमत ३१ लाखांवरून ५२ लाखांपर्यंत वाढवण्यात आल्याचे विजेत्यांना कळले होते. याबाबतचे वृत्त 'दै. पुढारी'ने १७ जुलै २०२५ रोजीच्या अंकात प्रसिद्ध केले होते.
चितळसर येथील ३१ लाखांच्या घरांची किंमत ५२ लाख करण्यात आली होती. वाढीव किंमतीला आमचा विरोध होता. पूर्वी निश्चित केलेल्या ३१ लाख रुपये किंमतीत घरे मिळावीत, अशी आमची मागणी होती. मात्र म्हाडा उपाध्यक्षांनी ५२ लाखांऐवजी ३६ लाख रुपयांत घरे देण्याचे मान्य केले. हा निर्णय आम्हाला मान्य आहे.
हेमंत पांडे, सोडत विजेते
वाढीव किंमतीत घरे घेण्यास विजेत्यांनी नकार दिला. त्यांनी विरोध सुरू केला. सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर अखेर म्हाडाने घरांच्या किंमतींवरून माघार घेतली आहे. सोडत विजेत्यांनी गुरुवारी म्हाडा उपाध्यक्षांची भेट घेतल्यानंतर किंमत कमी करण्यात आली. ५२ लाखांची घरे आता जुन्या सोडत विजेत्यांना ३६ लाखांत दिली जाणार आहेत. असे एकूण १५६ विजेते आहेत. मुख्य अधिकाऱ्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला.