

मुंबई: मुंबईतही सुर्यदेव आग ओकू लागला आहे. सलग दोन दिवस कमाल तापमान सरासरी 35 अंश सेल्सिअसवर जात आहे. त्यामुळे हवामान विभागाने (आयएमडी) शहर आणि उपनगरांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
आयएमडी मुंबईच्या सांताक्रुझ वेधशाळेमध्ये बुधवारी 35 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गुरुवारी त्याचीच पुनरावृत्ती अपेक्षीत आहे. वास्तविक पाहता सलग दोन ते तीन दिवस पारा हा सरासरी 36 ते 38 अंश सेल्सिअसवर जाण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर आयएमडीकडून यलो अलर्ट अर्थात उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवली जाते.
सध्या तापमान 35 अंशांवर गेले असले तरी प्रत्यक्ष जाणवणारे तापमान चाळीशीच्या घरात असल्याने मंगळवार आणि बुधवारी यलो अलर्ट जारी केला आहे.
एप्रिल महिन्याच्या मध्यावरच तापमानात झालेल्या वाढीमुळे दुपारच्या वेळी रस्ते ओस पडत आहेत. दादर, परळ, माटुंगा वडाळा या भागांत दुपारी उष्णतेचा तडाखा अधिक जाणवत आहे. अनेकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे.
थंड पेये, लिंबूपाणी, नारळपाणी यांची मागणी वाढली असून बाजारात त्याची विक्रीही वाढली आहे. दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना दुपारच्या उन्हात बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे.