

मुंबई : 1960 सालापासून कार्यरत असलेल्या ग्रॅन्टरोड येथील लोकमान्य टिळक मासळी मंडईतील सर्व परवानेधारकांनी बुधवारी एकत्र येत विकासकांच्या विरोधात एल्गार पुकारला. आपले पारंपरिक व्यावसायिक अस्तित्व अबाधित राखण्यासाठी कोणत्याही दबावाला बळी न पडण्याचा ठाम निर्धार या जाहीर सभेत एकमताने करण्यात आल्याची माहिती अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र दामोदर तांडेल यांनी दिली.
लोकमान्य टिळक मंडईमध्ये दोन बड्या विकासकांकडून परवानेधारकांवर सुरू असलेली दहशत, तसेच मुंबई महानगरपालिकेचे बाजार अधिकारी राठोड यांच्याकडून होत असलेला अनैतिक दबाव आणि या गंभीर प्रकारांवर पालिकेने साधलेली चुप्पी याविरोधात आवाज उठवण्यासाठी ही जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्या महिला अध्यक्षा नयना पाटील यांनी स्पष्ट केले की, बाजार अधिकारी राठोड यांच्याविरोधात सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.