

पोलादपूर : धनराज गोपाळ
Mumbai Goa Highway
कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. कशेडी घाटात जुन्या महामार्गावर भोगाव हद्दीत खचलेल्या रस्त्यावर दरड कोसळली आहे. येथे भला मोठा दगड रस्त्यावर आला आहे. तसेच रायगडमधील कोलाड- आंबेवाडी नाक्यावरील रस्त्यावर पाणी साचले आहे. मुंबई- गोवा महामार्गावर सुरू असलेला गटार लाईन सर्व्हिस रस्ता आणि मेन चौकातील उड्डाण पुलाच्या अर्धवट कामांमुळे पाणी साचले आहे. यामुळे या ठिकाणी मंगळवारी (दि.१५ जुलै) वाहतूक कोंडी निर्माण झाली. पनवेलच्या जवळ पळसपे फाटा येथेही वाहतूक कोंडी दिसून आली.
मुंबई- गोवा महामार्गावरील कशेडी घाटत सन २००५ पासून दरड कोसळणे सुरुच आहे. या ठिकाणी चौपदरीकरणात नव्याने झालेल्या महामार्गावर तर कधी जुन्या महामार्गावर दरड कोसळत आहे. यामुळे वाहतूक ठप्प होताना दिसते.
२००५ मध्ये कशेडी घाटातील जुन्या मार्गावर भोगाव हद्दीत सुमारे ९० ते १०५ फूट लांब आणि तीन ते चार फूट खोल खचलेल्या रस्त्यावर पुन्हा दरड कोसळली होती. या ठिकाणी उन्हाळ्यापासून रस्ता दुरुस्तीचे काम धीम्या गतीने सुरू आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.
२००५ पासून या महामार्गाच्या कामावर दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र या रस्त्याला कोणते ग्रहण लागले आहे, असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहेत. अद्यापही या कामाची अवस्था जैसे थे आहे. गेले दोन महिने या ठिकाणी काम सुरू आहे.
दरम्यान, मुंबई, ठाण्यासह रायगड, रत्नागिरी जिल्ह्याला आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर सिंधुदुर्गसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. गेल्या चोवीस तासांत खेडमध्ये पडलेल्या पावसामुळे नद्या पुन्हा दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. राजापूर तालुक्यातील अर्जुना मध्यम धरण प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. संगमेश्वर तालुक्यालाही मुसळधार पावसाने झोडपले आहे. येथील आठवडा बाजारात पाणी भरले आहे. आठवडा बाजार ते कोंड असुर्डे मार्ग बंद झाला आहे. रामपेठ शाळा, अंगणवाडी कडील रस्ताही वाहतुकीसाठी बंद झाला आहे. सोनवी नदीचे पात्राबाहेर पडले आहे.