Roha Heavy Rain | रोहा तालुक्यात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, शाळांना सुट्टी, दुकानांत पाणी शिरले, महामार्गावरील वाहतूक खोळंबली
Raigad Roha heavy rain
रोहे : रोहा तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरात मंगळवारी (दि. १५) सकाळ पासून मुसळधार पाऊस पडत आहे. विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
सोमवारी सायंकाळी पावसाने सुरुवात केली असुन रात्रभर रिपरिप पाऊस पडत असताना मंगळवारी मात्र मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली. रोहा शहरात मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी आले. कोर्ट रोड, दमखाडी नाका, सार्वजनिक बांधकाम कार्यालय आदी ठिकाणी पाणी रस्त्यावर आले होते. रोहा कोलाड मार्गावर काही ठिकाणी पाणी आले आहे. मुसळधार पावसामुळे रोहा तालुक्यातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.
शहरालगत असलेल्या भुवनेश्वर किल्ला मार्गावर काही ठिकाणी पाणी रस्त्यावर आले आहे. त्यामुळे रोहा - भुवनेश्वर किल्ला मार्गावर वाहतूक बंद झाली होती. मुसळधार पावसामुळे काही भागात पाणी रस्त्यावर आले. मुसळधार पावसाने मुंबई - गोवा महामार्गावरील आंबेवाडी नाक्याला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. खांब नाक्यावर महामार्गावर पाणी साचले आहे. महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर दुकानात पाणी शिरल्याने व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महाराष्ट्र ६६ वरील चौपदरीकरणाचे काम गेली १८ वर्षांपासून सुरु असुन आंबेवाडी तसेच खांब नाक्यावरील असंख्य कामे अद्याप ही अर्धवट स्थितीत आहेत. यामुळे अर्धवट कामामुळे या दोन्ही बाजापेठेत पूरस्थिती निर्माण झाली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील खांब येथील दीपक हॉटेल तसेच हॉटेल गोमांतक येथे तर भयावह परिस्थिती झाली आहे. वाहतूक धिम्म्या गतीने सुरू आहे. कोलाड पोलिस यंत्रणा आणि एसव्हीआरएसएस रेस्क्यू टीम यांच्या सहकार्याने वाहतूक सुरळीत ठेवली आहे. सर्व नागरिकांना आणि वाहनधारकांना सतर्क राहण्याचे इशारा प्रशासनाने दिला आहे.

