

Pudhari Maha Icon 2026 Uday Samant On Mumbai Goa Highway
मुंबई: मुंबई- गोवा महामार्गाचे ९९.९९ टक्के काम पूर्ण झाले आहे अशी आनंदवार्ता राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पुढारी ‘महा-आयकॉन्स २०२६’ सोहळ्यात दिली. हा महामार्ग अपूर्ण असल्याचे सतत सांगितले जाते. मात्र केवळ ४ किलोमीटरचे काम बाकी असल्यानेच मी रत्नागिरीहून या सोहळ्याला पाच तासांत पोहोचलो आणि मी हे जबाबदारीने सांगत आहे, असे सामंत म्हणाले.
उद्योगमंत्री सांमत पुढारी ‘महा-आयकॉन्स २०२६’ सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. देशभरात महामार्गाचे जाळे विणणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी त्यांची व्यासपीठावरच मुंबई-गोवा महामार्गावर चर्चा झाली.
या चर्चेचा धागा पकडून मंत्री सामंत म्हणाले, मुंबई-गोवा महामार्गाचे काय ? असा प्रश्न मला मंत्री गडकरी यांनी विचारला. त्यावर मी सांगतो की, मुंबई-गोवा महामार्गाचे ९९ टक्के काम पूर्ण झाले आहे. संगमेश्वरजवळ चार कि. मी. चे काम सुरू आहे. ते आणि माणगावजवळचा बायपास पूर्ण झाला की १०० टक्के मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण झाले, असे समजा.
तुमचे स्वप्न पूर्ण होईल. त्यामुळे बातम्यांकडे लक्ष देऊ नका. मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होण्याची तारीख दिली होती. लवकर काम पूर्ण होण्यासाठी गडकरी यांनी तारीख दिली होती, ती टळली असे कोणी म्हणत आहेत. पण हा महामार्ग पूर्ण होत असल्याचे सामंत यांनी सांगितले.
माझ्या आयुष्यातील हा विलक्षण योग आहे. या व्यासपीठावर बसलेल्या प्रत्येकाशी माझे एक वेगळे नाते आहे. बांधकाम व्यवसायाशी माझा संबंध आहे. माझे वडील छोटे बांधकाम व्यावसायिक होते. ज्यांनी परदेशातील रस्त्यांनाही लाजवतील असे रस्ते देशात बांधले ते नितीन गडकरी येथे उपस्थित आहेत. १९९५ मध्ये राज्यात युतीची सत्ता असताना गडकरी हे सार्वजनिक बांधकाम मंत्री झाले.
तेव्हा ते रत्नागिरीच्या दौऱ्यावर आले. त्यांनी कोकणात रस्ते बांधले. तेव्हा ते एकपदरी होते, आता सहा पदरी झाले आहेत. पण तेव्हा गडकरी यांनी माझ्या वडिलांना बोलावून रस्त्याचे काम दिले होते. तेव्हापासून आमच्या व्यवसायाची भरभराट झाली, अशी आठवण उद्योगमंत्री सामंत यांनी सांगितली. गडकरी यांच्याकडे पाहिले की ऊर्जा प्राप्त होते. आम्ही राज्यात सत्तांतर करण्यासाठी गुवाहाटीला गेलो होतो. तेथील रस्ते खूपच चांगले बांधले आहेत. तेथील लोक नितीन गडकरी यांचे कौतुक करत असल्याचे आम्हाला बघायला मिळाले, असे सामंत म्हणाले.
नितीन गडकरी हे केंद्रीय मंत्री झाले तेव्हा त्यांनी इलेक्ट्रिक वाहन वापरण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर पेट्रोल, डिझेलचे दर वाढले, तेव्हा इथेनॉलवरील वाहने वापरण्यास त्यांनी सांगितले. गडकरी हे एक ध्येयवादी व्यक्तिमत्त्व आहे आणि ते ध्येय पूर्ण करतात, असे सामंत म्हणाले.
ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांना पुढारी समूहातर्फे जीवन गौरव प्रदान करण्यात आला. त्यांचे अभिनंदन करत मंत्री उदय सामंत म्हणाले की, मी राज्याचा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री होतो, तेव्हा डॉ. काकोडकर यांच्या समितीत मी काम केले आहे. त्यांचे मार्गदर्शन मला लाभले.
अनिल काकोडकर हे देशाच्या अणु शक्तीचे प्रणेते आहेत. त्यांची एक समिती जेव्हा रत्नागिरीला एका अणुप्रकल्पाच्या पाहणीसाठी आली होती तेव्हा त्यांचा संयम मी बघितला आहे, असे सामंत यांनी नमूद केले.
मी पहिल्यांदा आमदार होणार हे मला सर्वात आधी आप्पा धर्माधिकारी यांनी सांगितले होते. आमदार-खासदार होशील, पण नेहमी पाय जमिनीवर ठेव, असा मोलाचा कानमंत्र त्यांनी मला तेव्हा दिला होता. त्यामुळे या व्यासपीठावरील सगळ्या मान्यवरांशी माझा वेगवेगळ्या पद्धतीने भेटीचा योग आलेला आहे हे माझे भाग्य समजतो, अशी कृतज्ञता सामंत यांनी व्यक्त केली.
पुढारीत पहिली बातमी
मी १९९८मध्ये राजकारणात सक्रिय झालो आणि १९९९ मध्ये एका पक्षाची कास धरली. याबाबतची पहिली बातमी पुढारीत छापून आली, तेव्हा मला वाटले की, मी आता ‘पुढारी’ झालो, असा किस्साही उदय सामंत यांनी सांगितला. पुढारी समूहाचे चेअरमन योगेशदादा जाधव हे माझे मित्र आहेत. कधीही कोणत्या उपक्रमासाठी माझी गरज पडली तर मी मित्र म्हणून तुमच्या सोबत आहे, असा शब्द सामंत यांनी दिला