

घाटकोपर : घाटकोपर रेल्वे स्थानक परिसर गुंडगिरीचा अड्डा बनल्याचे चित्र वारंवार समोर येत आहे. गुरुवारी (दि २९) घाटकोपर स्थानकालगत दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यात काही तरुण गंभीर जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी ८ जणांना रात्री उशिरा ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. आणखी सात ते आठ जणांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
घाटकोपर स्थानकाजवळील एका कॉलेजमध्ये शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांमध्ये काही कारणास्तव भांडणे सुरू झाली. त्यात घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळील गुंडगिरी करणाऱ्या टोळ्या शामिल झाल्या. हा वाद रस्त्यावर सुरू झाल्याने हातात काठ्या घेऊन या दोन गटांनी तुंबळ हाणामारी केली. यात काही जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच घाटकोपर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांची चुणक लागताच दोन्ही गटातील तरूणांनी घटनास्थळावरून पळ काढला, मात्र यातील एक जण हाती लागला. त्यांनंतर पोलिसांनी आणखी सात जणांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर रात्री उशिरा गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.