Ghatkopar Fire Incident : घाटकोपरच्या रॉयल अल्टेजा इमारतीला भीषण आग; १९वा मजला जळून खाक

तिघे जखमी; दिवाळीसाठी लावलेला दिवा पडद्याला लागल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज
Ghatkopar Fire Incident
घाटकोपर पूर्व येथील वल्लभबाग लेनमधील रॉयल अल्टेजा इमारतीच्या १९व्या मजल्यावर शुक्रवारी भीषण आग लागली.Pudhari
Published on: 
Updated on: 

घाटकोपर : घाटकोपर पूर्व येथील वल्लभबाग लेनमधील रॉयल अल्टेजा इमारतीच्या १९व्या मजल्यावर शुक्रवारी (दि. ६) भीषण आग लागली. दिवाळीनिमित्त लावलेला दिवा पडद्याला लागल्याने आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेत तिघे जण जखमी झाले असून, आगीत संपूर्ण मजला जळून खाक झाला आहे.

या ठिकाणी काम करणारे साईनाथ भगवान आवळे (४५) हे आग विझविण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्या चेहऱ्यासह दोन्ही हातांना भाजले. त्यांना तातडीने राजावाडी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर पुढील उपचारांसाठी त्यांना कस्तुरबा रुग्णालयात हलविण्यात आले.

दरम्यान, या इमारतीचे विकासक नितेश लोडया यांचे भाऊ निरव आणि राजेश हे दोघेही धुरामुळे गुदमरून किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या आणि क्रेन घटनास्थळी दाखल झाल्या. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू होते. आगीचे नेमके कारण शोधण्याचे काम अग्निशमन दलाकडून सुरू असून, दिव्यामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.