

Free Transport Ganpati Festival
मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सर्वच राजकीय पक्षांनी गणेशोत्सवात कोकणात जाणार्या चाकरमान्यांसाठी मोफत प्रवास घडवून आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाडी चालवण्यासह एसटी व खासगी बस आरक्षित करण्यात येणार आहेत.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीमुळे मतदारांना विशेषत: चाकरमान्यांना खूश करण्यासाठी येणार्या काळात राजकीय पक्षांचे प्रयत्न राहणार आहेत. निवडणुकीपूर्वी गणेशोत्सव येत असल्यामुळे यावेळी भाजपासह शिवसेना, शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सिंधुदुर्ग रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात विशेष बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुकानिहाय या बस चालवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
भाजपाने मुंबई, ठाणे व पालघर जिल्ह्यातून पहिल्या टप्प्यात एक हजारापेक्षा जास्त बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची मागणी वाढल्यास बसची संख्या वाढवण्यात येणार आहे. अतिरिक्त बस उपलब्ध व्हाव्यात, यासाठी भाजपाने एसटी महामंडळाला राज्याच्या विविध जिल्ह्यातून बस उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. या बस उपलब्ध करून देण्यासाठी लवकरच एसटी महामंडळाला पत्र दिले जाणार आहे.
कोकणात मोठ्या प्रमाणात चाकरमानी जात असल्यामुळे रेल्वेच्या नियमित गाड्यांसह विशेष गाड्याही हाउसफुल होतात. त्यामुळे राजकीय पक्षांमार्फत सोडण्यात येणार्या बसचा चाकरमान्यांना मोठा फायदा होणार आहे. एसटी बसची संख्या अपुरी पडल्यास खासगी बसही भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. तशी विचारनाही खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांकडे करण्यात आली आहे.
राजकीय पक्षांच्या मोफत गाड्यांची घोषणा ऑगस्टमध्ये होण्याची शक्यता आहे. या गाड्यातून मोफत प्रवास करण्यासाठी चाकरमान्यांना आगाऊ आसन आरक्षित करावे लागणार आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यालयात तिकीट आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.