

मुंबई: अधूनमधून पावसाच्या सरी, मुर्ती भोवताली उठणारे धुराचे लोट, चकचक्यांचे फटाके आणि त्यात घुमणारा ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष...रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या गणेशभक्तांच्या नजरा बाप्पावर खिळलेल्या.
गणेशोत्सवाला अद्याप आठवडा बाकी असला, तरी दक्षिण मुंबईचा परिसर रविवारी बाप्पाच्या आगमन मिरवणुकांनी दुमदुमला होता. रात्री उशिरापर्यंत मुंबई शहर व उपनगरात शंभरहून अधिक सार्वजनिक गणेश मुर्ति मंडपात दाखल झाल्या.
येत्या १४ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. त्यापूर्वीच्या तयारीसाठी हा शेवटचा रविवार असल्याने विविध मंडळांच्या गणेशमूर्ती मंडपात नेण्यासाठी सकाळपासूनच कार्यकर्त्यांची लगबग सुरू होती. दुपारनंतर या लगबगीचे रूप मिरवणुकीत बदलले आणि लालबाग-परळच्या रस्त्यांवर बाप्पाच्या स्वागताचा जल्लोष सुरू झाला होता.
ओम तांडव गणेशोत्सव मंडळ, धोबीघाटचा राजा, फोर्टचा राजा, महालक्ष्मीचा मोरया, प्रगती सेवा मंडळ, मुंबईचा एकदंत आणि रे रोडचा राजा अशा विविध मंडळांच्या मूर्ती वाजत-गाजत मंडपाकडे निघाल्या.
मिरवणुकांमुळे वाहतुक बंद
बाप्पा मंडपाजवळ पोहोचताच कार्यकर्त्यांच्या उत्साहाला आणखी उधाण येत होते. मिरवणुकांमुळे दक्षिण मुंबईतील काही रस्ते व परिसरातील काही मार्गांवरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.
गणेश मूर्तीवर भक्तांच्या नजरा खिळल्या
एखादी भव्य मूर्ती गर्दीतून पुढे सरकत होती, तिच्या मागे मंडळांचे टी-शर्ट घातलेले तरुण कार्यकर्ते होते. रस्त्याच्या कडेला उभे असलेले नागरिक मोबाईलमध्ये क्षण टिपत होते. उंच मूर्ती लालबागचा पूल व उड्डाणपुलाखालून जाताना त्या पाहण्यासाठी गर्दीची नजर क्षणभर वरच खिळून राहत होती.
ओम तांडव गणेशोत्सव मंडळाची मूर्ती विशेष आकर्षण ठरली. पांढऱ्याशुभ्र ढगांवर विराजमान झालेला बाप्पा, अंगावर गुलाबी वस्त्र, खांद्यावर जांभळा शेला आणि डोक्यावर सुवर्णमुकुट... बाप्पाच्या मागे हवेत झेपावलेली तांडवमुद्रेतील हनुमानाची भव्य प्रतिमा या देखाव्याला वेगळेच रूप देत होती. रचना पाहण्यासाठी मिरवणुकीत अनेकांच्या नजरा या मूर्तीवर खिळल्या होत्या.