Dahi Handi 2026 Mumbai: यंदा ११ थरांच्या मनोऱ्यांचे स्वप्नच! १० थरांचा गतवर्षीचा विक्रम मोडण्यात अपयश

३१ पथकांपैकी २९ पथकांनी रचले ९ थर
Dahi Handi 2026
Dahi Handi 2026Pudhari
Published on
Updated on

मुंबई: उत्सवापूर्वी ११ थरांचा दावा करणाऱ्या दिग्गज गोविंदा पथकांच्या यंदाच्या दहीहंडीतील विक्रमाच्या महत्त्वाकांक्षेला मोठा धक्का बसला. जय जवान, कोकण नगर आणि आर्यन्स यांसारख्या नामांकित पथकांनी १० आणि ११ थरांसाठी जोरदार प्रयत्न केले; मात्र अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे मुंबईतील अनेक मातब्बर गोविंदा पथकांना यंदा ९ थरांवरच समाधान मानावे लागले.

विशेष म्हणजे, गेल्या वर्षी रचलेला १० थरांचा विक्रमही यंदा मोडता आला नाही.मुंबईतील तब्बल ३१ गोविंदा पथकांनी ९ थरांच्या यादीत स्थान मिळवले. त्यापैकी २९ पथकांनी ९ थरांची सलामी दिली. मात्र माझगाव ताडवाडी व बोरीवलीच्या शिवशाही गोविंदा पथकांना यंदा ९ थरांची कामगिरीही करता आली नाही.

Dahi Handi 2026
Dahi Handi Injured Govinda: उत्साहाच्या थरांना जखमांचे गालबोट; यावर्षी ३७६ गोविंदा जखमी

९ थर लावण्यात अपयश आलेले गोविंदा पथक

१) माझगाव ताडवाडी, २) शिवसाई बोरिवली

महिला गोविंदांनी रचले ७ थर

दरम्यान, महिला गोपिकांच्या गटात पार्ले स्पोर्ट्स आणि शिवतेज ठाणे या पथकांनी ७ थरांची कामगिरी केली.

९ थर रचणारी मुंबईतील प्रमुख पथके

१) जय जवान जोगेश्वरी, २) कोकण नगर जोगेश्वरी, ३) आर्यन्स जोगेश्वरी, ४) खोपट ठाणे, ५) अष्टविनायक वडाळा, ६) यश वडाळा, ७) मालपा डोंगरी अंधेरी, ८) ठाण्याचा राजा, ९) कांजूरमार्गचा महाराजा, १०) सीपी तलाव ठाणे, ११) विघ्नहर्ता सांताक्रुझ, १२) जरीमरी गिरगाव

गतवर्षीचा विक्रम यंदाही कायम

२०२५ मध्ये जोगेश्वरीतील कोकण नगर आणि जय जवान गोविंदा पथकांनी १० थर रचत इतिहास घडवला होता. मानवी मनोऱ्याच्या उंचीबाबत स्पेनच्या कॅस्टेलर्सचा विक्रम मोडल्याची नोंदही गिनीज बुकमध्ये झाली होती. त्यामुळे यंदा ११ थरांचा नवा विक्रम होईल, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात ११ थर तर दूरच राहिले; गेल्या वर्षीचा १० थरांचा विक्रमही अबाधित राहिला.

Dahi Handi 2026
Konkan Ganeshotsav 2026: गणेशोत्सवासाठी २५ लाख चाकरमानी जाणार कोकणात; रेल्वे, एसटी फुल्ल

जोखीम मोठी; बक्षीसे कमी!

उंच थर रचताना गोविंदा पथकांना मोठी जोखीम पत्करावी लागते. सरावापासून सुरक्षा साहित्य, टी-शर्ट, वैद्यकीय सुविधा आणि दहीहंडीच्या दिवशी ॲम्ब्युलन्सपर्यंत लाखो रुपयांचा खर्च होतो. गोविंदा जखमी झाल्यास त्यांच्या उपचारांसाठीही पथकांना आर्थिक मदत करावी लागते. त्यामुळे १० थरांपेक्षा कमी थरांच्या दहीहंड्यांमध्ये जोखीम अधिक आणि बक्षिसाची रक्कम तुलनेने कमी असल्याने पथकांसमोर यंदा खर्च आणि जोखीम यांचे गणितही आव्हानात्मक ठरले.

या १७ नवीन गोविंदा पथकांनी लावले नऊ थर

१) रामनगरचा राजा ठाणे, २) कांजूरमार्गचा राजा, ३) शिवनेरी भांडुप, ४) ओमकार गिरगाव, ५) मरिआई मेटपाडा अलिबाग, ६) शिवगणेश नालासोपारा, ७) ओम साई माऊली कांदिवली, ८) ओम साई बोरिवली, ९) साईराम जोगेश्वरी, १०) शानदार कांजूरमार्ग, ११) अजिंक्य तारा नालासोपारा, १२) आर्यन धारावीकर, १३) संतनगर, १४) बालमित्र व्यायामशाळा सांताक्रुझ, १५) आग्रेश्वर अँटॉप हिल, १६) खारचा राजा साई प्रसाद गोविंदा पथक (खार पूर्व), १७) हिंदू एकता जोगेश्वरी

आजारपणाचाही फटका

गोविंदा पथकातील अनेक तरुणांना व्हायरल तापाची लागण झाल्याची माहिती आहे. त्यामुळे सराव आणि प्रत्यक्ष दहीहंडीच्या दिवशी मनुष्यबळावरही परिणाम झाल्याचे सांगितले जाते. परिणामी, विक्रमाच्या शर्यतीत उतरलेल्या काही पथकांना अपेक्षित ताकदीने प्रयत्न करता आले नसल्याचे चित्र दिसले.‘यंदा थोडक्यात कमी पडलो; पुढील वर्षी अधिक जोरदार तयारी करून विक्रम करण्याचे स्वप्न पूर्ण करू,’ असा निर्धार अनेक दिग्गज गोविंदा पथकांनी व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news