

मुंबई: अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीत मुंबई विभागातील विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेला सर्वाधिक पसंती दिल्याचे चित्र समोर आले आहे. मुंबई शहर व उपनगर, ठाणे, रायगड आणि पालघर या चार जिल्ह्यांतील प्रवेश आकडेवारीनुसार विज्ञान शाखेत सर्वाधिक प्रवेश निश्चित झाले असून वाणिज्य शाखेत सर्वाधिक जागा अद्याप रिक्त आहेत.
पहिल्या फेरीअखेर विभागातील एकूण ४ लाख ७७ हजार २९० जागांपैकी ७६ हजार २१४ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. तर अजूनही दीड लाखावर विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतिक्षेत आहेत.
अकरावी प्रवेशाची पहिली फेरी पूर्ण झाली असून आता दुसऱ्या फेरीच्या पसंतीक्रम देण्याची तसेच बदलण्याची संधी विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे. ९ जून हा शेवटचा दिवस आहे. पहिल्या फेरीत तब्बल १ लाख ३३ हजार ३२३ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी दिली होती.
यापैकी महाविद्यालयात जावून ७६ हजार २१४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. शाखानिहाय पाहिल्यास विज्ञान शाखेतील १ लाख ६७ हजार ७४० जागा आहेत. त्यापैकी पहिल्या फेरीत ३३ हजार ३८५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असल्याने पहिल्या फेरीत विज्ञान शाखेचे वर्चस्व दिसून आले आहे.
वाणिज्य शाखेत २ लाख ३४ हजार ४३० जागा मुंबई विभागात आहेत तर या जागापैकी या फेरीत ३२ हजार २१४ प्रवेश झाले तर कला शाखेत ७५ हजार १२० जागा आहेत. यापैकी १० हजार ६१५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. विज्ञान शाखेतील प्रवेशांची संख्या सर्वाधिक असली तरी तीनही शाखांमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणावर जागा रिकाम्या आहेत.
अकरावीच्या पहिल्या फेरीनंतर लाखो विद्यार्थी प्रवेशापासून दूर आहेत. पहिल्या फेरीत ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही, अशा विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीत जर अकरावीला प्रवेश हवा असल्यास विद्यार्थ्यांना मिळालेले गुण आणि पहिल्या फेरीनंतर महाविद्यालयातील शिल्लक जागांचा योग्य ताळमेळ लक्षात घेवून प्रवेशासाठी महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरले तरच दुसऱ्या यादीत प्रवेश मिळण्याची शक्यता आहे.
कमी गुण मिळालेला विद्यार्थीही नामवंत महाविद्यालयांची आशा बाळगतो. यामुळे प्रवेश न मिळाल्याच्या तक्रारी आहेत. टक्केवारी कमी असताना जर नामवंत महाविद्यालयांचा पर्याय निवडला असल्यास विद्यार्थ्यांना पुन्हा या यादीत प्रवेशाची नो गँरटी असणार आहे. यामुळे या फेरीत काळजीपूर्वक पसंतीक्रम भरावेत असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.