

मुंबई: पुण्यातील विषारी दारूकांडानंतर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) थेनॉलच्या साठवणूक, वितरण आणि विक्रीवर व्यापक मोहीम सुरू केली आहे. राज्यातील ९८८ परवानाधारक संस्थांपैकी २२६ संस्थांची तपासणी पूर्ण झाली असून नियमभंग आढळलेल्या ५१ संस्थांवर कारवाई करत त्यांचे कामकाज बंद करण्यात आले आहे. उर्वरित सर्व संस्थांची तपासणी पुढील सात दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.
पुणे विषारी दारू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मिथेनॉल पुरवठ्याच्या साखळीची कसून चौकशी सुरू असून भिवंडीतील रेक्स इंटरनॅशनल या संस्थेवरही मोठी कारवाई करण्यात आली आहे. या संस्थेचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून तेथून ५ हजार २२९ किलो संशयित मिथेनॉलचा सुमारे ३.६० लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. संबंधित गाळा सील करण्यात आला असून मालकांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिथेनॉल हे अत्यंत विषारी रसायन असल्याने त्याच्या उत्पादन, साठवणूक आणि विक्रीवर कठोर नियंत्रण आवश्यक आहे. त्यामुळे तपासणी पथकांकडून परवानाधारक संस्थांमधील साठा, नोंदवही, वितरण व्यवस्था तसेच परवान्याच्या अटींचे पालन यांची बारकाईने पडताळणी केली जात आहे. एफडीएच्या या राज्यव्यापी मोहिमेमुळे मिथेनॉलचा गैरवापर रोखण्यास मदत होणार असून बेकायदा साठा आणि वितरण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.