Flood Free Master Plan: ‘पूरमुक्त’ मुंबईसाठी १३ हजार कोटींचा आराखडा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा

मंजुरी मिळताच कामाची सुरुवात करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.
Flood Free Master Plan
Flood Free Master PlanPudhari
Published on
Updated on

मुंबई: मुंबईला पूरमुक्त करण्यासाठीचा १३ हजार कोटींचा एकात्मिक आराखडा मंजुरीसाठी केंद्राकडे पाठविण्यात आला आहे. मंजुरी मिळताच कामाची सुरुवात करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.

मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस आणि भरती एकाच वेळी आल्यास मुंबईतील ३७० हॉटस्पॉटवर पाणी साचते. हे पाणी बाहेर काढण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. यातून दरवर्षी पाणी साचण्याच्या समस्येतून मुंबईकरांची सुटका होईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

Flood Free Master Plan
Maharashtra Politics: मला बदनाम करा, पण महाराष्ट्राचा अवमान कराल तर सोडणार नाही! विरोधकांच्या आरोपांवर मुख्यमंत्री आक्रमक

कमजोर मुळांची झाडे हटवणार

यंदा मुंबईत अवघ्या सहा दिवसांत जुलै महिन्याच्या सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. सहा दिवसांत कुलाबा येथे ८८२ मि.मी. आणि सांताक्रूझ येथे ९८८ मि.मी. पावसाची नोंद झाली. केवळ सहा दिवसांत वार्षिक पावसाच्या सुमारे ४२ टक्के पाऊस झाला. ताशी ५० ते ७५ किलोमीटर वेगाचे वारे आणि चार मीटरपेक्षा अधिक उंच भरतीमुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली.

अशा परिस्थितीतही विविध यंत्रणांनी प्रभावी कामगिरी केली. मुंबईत जुन्या झाडांच्या मुळांची क्षमता मोजून, मुळे अधिक घट्ट करण्या‍बाबत महापालिकेला सूचना दिल्या आहेत. तसेच, ज्या झाडांबाबत ते करता येत नसेल, ती विहित पद्धतीचा उपयोग करून काढली पाहिजेत, अशा सूचनाही महापालिकेला दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

वसई-विरारची परिस्थिती गंभीर

वसई-विरारची परिस्थिती गंभीर असून १ जुलैपासून दररोज जवळपास १०० मि.मी.पेक्षा जास्त पाऊस सुरू आहे. ‘एनडीआरएफ’ आणि ‘एसडीआरएफ’च्या तुकड्या तिथे तैनात आहेत. मोबाईल आणि वीज कनेक्शन पूर्ववत करण्याचे काम चालू आहे. कोकणातील अशा काही जिल्ह्यांना आपण जादा निधीही दिला असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

२०३० पर्यंत मुंबईला मुबलक पाणी

मुंबईच्या वाढत्या पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी गारगाई प्रकल्पास आवश्यक वनमंजुरी मिळाली असून २०२९ पर्यंत ५०० एमएलडी अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार आहे. मनोरी आणि वर्सोवा येथे डिसॅलिनेशन प्रकल्प उभारले जात असून २०३० पर्यंत एक हजार एमएलडी गोडे पाणी उपलब्ध करण्याचे नियोजन आहे. एमएमआरच्या वाढत्या पाणी गरजा लक्षात घेऊन पाणीपुरवठा योजनेचे आधुनिकीकरण करण्याचे नियोजन असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

Flood Free Master Plan
Aaditya Thackeray Devendra Fadnavis: 'मिशन देवेंद्र'मध्ये भाजपचे नेतेही सामील, हे शेवटचं अधिवेशन; आदित्य ठाकरेंचा खळबळजनक दावा

काँक्रीट रस्ते, बोगदे आणि पार्किंग प्रकल्पांना गती

मुंबईतील ९५ टक्के रस्ते काँक्रीटीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. पहिल्या टप्प्यातील ८९ टक्के आणि दुसऱ्या टप्प्यातील ७३ टक्के काम पूर्ण झाले असून मे २०२७ पर्यंत संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. वाहतूक व्यवस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी गोरेगाव-मुलुंड बोगदा, उत्तर किनारी मार्ग, विविध उड्डाणपूल, रेल्वे उड्डाणपूल आणि ईस्ट-वेस्ट कनेक्टिव्हिटी प्रकल्प वेगाने पूर्ण केले जात आहेत. बहुमजली रोबोटिक पार्किंग आणि भूमिगत पार्किंग सुविधांनाही गती देण्यात येत आहे.

धारावीत दीड वर्षात १० हजार घरे बांधणार

धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे नियोजन करताना तिथल्या लघू उद्योगांचा विचार केलेला आहे. हा केवळ गृहनिर्माण प्रकल्प नसून तिथल्या सर्व उद्योगांसाठी आधुनिक व्यवस्था तिथे तयार करणार आहोत. पुढील दीड वर्षात पुनर्वसनाची १० हजार घरे पूर्ण करायची आणि त्याच्‍या चाव्या देण्याचा कार्यक्रम पंतप्रधानांच्या हस्ते करायचा, असा निर्धारही फडणवीस यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news