Maharashtra Politics: मला बदनाम करा, पण महाराष्ट्राचा अवमान कराल तर सोडणार नाही! विरोधकांच्या आरोपांवर मुख्यमंत्री आक्रमक

हिंमत होती म्हणून महायुतीने कनेक्टिंग लिंक बांधला
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsPudhari
Published on
Updated on

मुंबई: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील कनेक्टिंग लिंकबाबत विरोधकांचा खोटारडेपणा उघड झाला आहे. दरड कोसळल्यानंतर १८ तासांत वाहतूक सुरू झाली, तरी टी.व्ही.वर येऊन खोटे बोलण्याचा उद्योग काही लोक करतात.

मात्र, महायुती सरकारची हिंमत होती म्हणून आम्ही कनेक्टिंग लिंक केली, त्याने संपूर्ण घाटातील अपघात आणि वाहतूक कोंडी संपली, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला. अतिवृष्टीसह मुंबई महानगरातील प्रश्नांवरून विरोधकांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतानाच महायुती सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली.

Maharashtra Politics
Credit Cards | प्रथमच क्रेडिट कार्ड घेणाऱ्यांत निम्मे जेन-झी!

विधानसभेत झालेल्या चर्चेला फडणवीस यांनी बुधवारी उत्तर दिले. या चर्चेदरम्यान, विरोधकांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या दुर्घटना, कनेक्टिंग लिंकवर कोसळलेली दरड, मुंबईतील वाहतूक कोंडी, धारावी पुनर्वसन प्रकल्प, मुंबई महापालिकेतील ठेवी आदी मुद्द्यांवर केलेल्या टीकेला त्यांनी आक्रमक शैलीत उत्तर दिले.

विशेषतः, कनेक्टिंग लिंकबाबत झालेल्या टीकेवर मुख्यमंत्र्यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. एक कोटी खोटारडे लोक मेल्यानंतर काही लोक पैदा झाले आहेत. त्यांना खोटे बोलायला लाजही वाटत नाही. कनेक्टिंग लिंकच्या कमानीवर दरड कोसळली. लिंकवरील पूल अथवा बोगद्याला काहीही झाले नाही; पण कनेक्टिंग लिंकच तुटली, ७ हजार कोटी पाण्यात गेले, असा प्रचार केला. हे इंजिनिअरिंग मार्व्हल आहे.

जगातील सर्वात मोठा बोगदा आणि भारतातील सर्वात उंच केबल पूल आपण तयार केला. या लिंकमुळे घाट रस्त्यातील अपघात आणि वाहतूक कोंडी संपली. तुम्ही मला शिव्या द्या, मला सवय आहे, मी शिव्याप्रूफ आहे; पण आजपासून दहा वर्षांनी शिव्या देणारे नसतील; पण कनेक्टिंग लिंक असेल आणि फडणवीस, शिंदेंचे नाव असेल.

तुम्ही मला बदनाम करा; पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. ज्यांना कुत्रे विचारत नाही, ते सोशल मीडियावर येऊन मुख्यमंत्र्यांसह सगळ्यांना शिव्या देतात. असेच काही भाड्याचे टट्टू पैसे घेऊन कनेक्टिंग लिंकबाबत सोशल मीडियावर लिहीत होते. त्यांना सांगतो, महाराष्ट्राचा अवमान कराल तर सोडणार नाही, अशा शब्दांत फडणवीस यांनी इशारा दिला.

दरड कोसळल्याच्या घटनेने आपल्याला काही गोष्टी शिकवल्या. पाण्याचा प्रवाह कसा बदलू शकतो, दरड कशी कोसळू शकते, हे लक्षात आले आहे. आपण आयआयटी तज्ज्ञांशी चर्चा केली, त्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने नवीन आराखडा दिला आहे, तो राबवू, त्‍यामुळे कदाचित पुढच्या वेळी अशी घटना घडणार नाही, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

ज्यावेळी कोकण रेल्वे मार्ग बांधायची वेळ आली, तेव्हाही इथे दरडी कोसळतात, ही रेल्वे चालणार नाही, असे सांगितले गेले; पण मधू दंडवते या माणसात हिंमत होती म्हणून त्यांनी हा रेल्वे मार्ग बांधला.

Maharashtra Politics
Mumbai water stock : मुंबईचा ४३ दिवसांचा पाणीसाठा २४ तासांत जमा

भीतीने कोकण रेल्वे केलीच नसती तर काय अवस्था झाली असती? असा प्रश्न फडणवीसांनी उपस्थित केला. कनेक्टिंग लिंकचा इतिहासही असाच आहे. मागच्या आघाडी सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी १४ कारणे सांगून ही लिंक करता येणार नाही, असे सांगत फाईल बंद केली, अशी टीकाही फडणवीस यांनी केली.

मुंबई आणि परिसरात राज्य सरकारतर्फे ६ लाख १४ हजार ८७१ कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. तर, ६ लाख ११ हजार ८३६ कोटी रुपयांची कामे पुढील तीन वर्षांत टप्प्याटप्याने हाती घेतली जाणार आहेत. मुंबई आणि परिसरात ९० कि.मी. मेट्रो कार्यान्‍वित झाली आहे. तर, ११८ कि.मी.ची कामे प्रगतिपथावर आहेत. ८४ कि.मी.च्या निविदा काढल्या आहेत, तर ८७ कि.मी. मेट्रो प्रकल्प ‘डीपीआर’स्तरावर असल्याची माहितीही त्यांनी दिली. या सरकारला विकासात रुची आहे. कोणी कितीही टीका केली तरी आमचे काम सुरूच राहील, असेही फडणवीस म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news