मुंबई : पुढारी वृत्तसेवा : कार शेडचा वाद, काही वर्षाची प्रतीक्षा, उद्घाटनाविषयी उठलेल्या अफवा, इत्यादी सर्व घटनाक्रमानंतर अखेर मुंबईची संपूर्ण भुयारी मेट्रो प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी सज्ज झाली आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात या मेट्रोचे लोकार्पण केले जाणार असल्याचे एमएमआरसीएलने जाहीर केले आहे; मात्र त्यापूर्वी कमिशनर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टी यांचे सुरक्षा प्रमाणपत्र मिळणे आवश्यक आहे.
दाट लोकसंख्येच्या ठिकाणी प्रवासाची लोक सुलभ सेवा उपलब्ध करून देणे, हा भुयारी मेट्रो मार्गिका उभारण्यामागचा हेतू असतो. कोलकाता, दिल्ली आणि चेन्नई या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून मेट्रो मार्गिका सुरू आहेत. या मार्गिकांचा काही भाग हा भुयारी तर काही उन्नत पद्धतीने बांधण्यात आलेला आहे. मुंबईत सध्या सुरू असलेल्या मेट्रो १, मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या मार्गिका संपूर्ण उन्नत पद्धतीने बांधण्यात आल्या आहेत; मात्र लवकरच सुरू होणारी मेट्रो ३ मार्गिका संपूर्ण भुयारी आहे.
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या ३३.५ किमी मार्गावर मेट्रो ३ चालवली जाणार आहे. आरे येथे कारशेड बांधण्यात आली आहे. आरे ते बीकेसी या १२.४४ किमीच्या टप्प्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात मेट्रो ३ची आरडीएसओ चाचणी पूर्ण झाली होती. त्यानंतर सीएमआरएस चाचणीला मात्र बराच विलंब झाला; मात्र आता मेट्रो गाड्या, डबे, रूळ यांची सीएमआरएस चाचणी पूर्ण झाली आहे. आता इतर सुविधा व यंत्रणांची सीएमआरएस चाचणी केली जाईल. सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर आरे ते बीकेसी वाहतूक सुरू करता येईल.
ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आरे ते बीकेसी हा मेट्रो ३ मार्गिकेचा पहिला टप्पा प्रवाशांसाठी खुला होईल; मात्र हा निर्णय सीएमआरएस चाचणीच्या अधीन असेल, असे एमएमआरसीएलच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यातील वाहतुकीसाठी ४८ चालक नेमण्यात आले आहेत. त्यापैकी १० महिला आहेत. दर दिवशी साडे चार लाख प्रवासी प्रवास करतील, असे अपेक्षित आहेत.
पहिल्या टप्प्यातील मेट्रो ३ मार्गिका मेट्रो १ मार्गिकेला मरोळ नाका येथे जोडेल, मरोळ नाका स्थानक भुयारी असून तेथून बाहेर पडून मेट्रो १ मार्गिका गाठता येईल. मेट्रो ७ अ मार्गिकचे विमानतळ स्थानक आणि मेट्रो ३ चे विमानतळ स्थानकही एकाच ठिकाणी आहे. तसेच आरे स्थानकाच्या समोरच मेट्रो ६ मार्गिकचे सीप्झ गाव हे स्थानक आहे. मेट्रोतून बाहेर पडलेल्या प्रवाशांना इतर ठिकाणी जाणे सोयीचे व्हावे, यासाठी मेट्रो स्थानकांच्या जवळच बसथांबे उभारले जावेत, यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.
बीकेसी ते कफ परेड हा दुसरा टप्पा मार्चपर्यंत सुरू करण्यासाठी एमएमआरसीएल प्रयत्नशील आहे. ६ स्थानकांचे काम पूर्ण झाले आहे. वरळी व गिरगाव या स्थानकांसाठी कमी जागा उपलब्ध असल्याने त्यांचे काम पूर्ण होण्यास विलंब होत आहे.
पहिल्या टप्प्यात आरे ते बीकेसी मार्गावर ९ गाड्या धावणार आहेत. सकाळी ६.३० ते रात्री १०.३० वाजेपर्यंत रोज ९६ फेऱ्या चालवल्या जातील. सुट्टीच्या दिवशी सकाळी ८.३० वाजता मेट्रो सुरू होईल. दर ६ मिनिटे ४० सेकंदांनी मेट्रो सोडली जाईल. किमान १० रुपये ते कमाल ५० रुपये तिकीट दर असेल. आरे ते कफ परेड संपूर्ण मार्गिका सुरू झाल्यानंतर मात्र तिकीटदर आणि फेऱ्यांच्या संख्येत बदल होईल. संपूर्ण मार्गिकसाठी कमाल तिकीट दर ७० रुपये असेल. ३० ऑक्टोबरपर्यंत एकात्मिक तिकीट प्रणाली उपलब्ध होईल. यामुळे सर्व मेट्रो मार्गिकांवर एकाच तिकिटाद्वारे प्रवास करता येईल.