

मुंबई: मुंबईत सध्या ताप, सर्दी, खोकला, घसा दुखणे, अंगदुखी आणि अशक्तपणाच्या तक्रारी घेऊन डॉक्टरांकडे येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. पावसाळा आणि हवामानातील बदलामुळे श्वसनविषाणूंचा प्रसार वाढल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. ताप काही दिवसांत कमी होत असला तरी अनेक रुग्णांमध्ये खोकला मात्र एक ते दोन आठवडे किंवा त्याहून अधिक काळ कायम राहत आहे.
फोर्टिस रुग्णालयाच्या औषध विभागाच्या संचालक डॉ. अनिता मॅथ्यू यांनी सांगितले की, पावसाळ्यात श्वसनविषाणूंचे संक्रमण वाढते. बहुतांश संसर्ग सौम्य असतात. मात्र, लक्षणे दीर्घकाळ टिकत असतील, वाढत असतील तर वैद्यकीय तपासणी आवश्यक आहे.
खोकला तीन आठवडेही राहू शकतो
जे. जे. रुग्णालयाच्या औषध विभागाचे प्रमुख डॉ. मधुकर गायकवाड यांनी सांगितले की, सर्दी-खोकल्यातून बरे झाल्यानंतरही काही रुग्णांना काही दिवसांनी पुन्हा खोकला आणि कफाच्या तक्रारी जाणवतात.
श्वसनमार्गाचा संसर्ग झाल्यानंतर खोकला पूर्णपणे कमी होण्यासाठी काही वेळ लागू शकतो. खोकला कमी होण्याऐवजी वाढत असेल, ताप पुन्हा येत असेल किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर तपासणी आवश्यक आहे.
महापालिकेच्या जून ते १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीतील आकडेवारीनुसार मुंबईत स्वाईन फ्ल्यूचेे ४८८ रुग्ण आढळले आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत ही संख्या ६५ होती. मलेरियाचेही ५,९८४ रुग्ण नोंदले गेले आहेत.
मलेरिया, डेंग्यू, स्वाईन फ्ल्यूचाही धोका
जून ते १५ सप्टेंबरदरम्यान मलेरियाचे ५ हजार,९८४ रुग्ण झाले असून, मागील वर्षी याच कालावधीत ही संख्या ४ हजार ३०४ होती. स्वाईन फ्ल्यूचे रुग्णही ६५ वरून ४८८ झाले. मात्र डेंग्यू २ हजार ७२४ वरून २ हजार ६५६ आणि गॅस्ट्रो ५ हजार ९८९ वरून ४ हजार ९९७ वर आले आहेत.
प्रतिजैविके स्वतःहून घेऊ नका
व्हायरल संसर्गावर प्रतिजैविकांचा उपयोग होत नाही. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय प्रतिजैविके घेणे टाळावे. ताप, खोकला आणि घसा दुखणे काही दिवसांत कमी होत नसल्यास किंवा खोकला दोन आठवड्यांहून अधिक काळ कायम राहत असल्यास डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी.
श्वास घेण्यास त्रास, छातीत दुखणे, तीव्र अशक्तपणा, ऑक्सिजनची पातळी कमी होणे किंवा ताप कमी झाल्यानंतर पुन्हा वाढणे अशी लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीयमदत घ्यावी.
१ जानेवारी २०२६ ते १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत कोव्हिड १९चे मुंबई महापालिकेत १७८ रुग्णांची नोंद होती. कोव्हिडचे रुग्ण मागील वर्षाच्या तुलनेत कमी आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत ६७७ रुग्ण होते. म्हणजे यंदा कोव्हिडच्या रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे.