

मुंबई: चेंबूर येथील वाशीनाका परिसरात प्रयागनगरमधील पार्ले अॅग्रो कंपनीच्या गोदामावर एफडीएच्या पथकाने छापा टाकून फ्रुटी, अॅपे फिज, कोल्ड ड्रिंक्स आणि कॅन्डी ज्यूसचा एक लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुदतबाह्य साठा जप्त केला आणि या गोदामाला शुक्रवारी सील ठोकले.
एल. यू. गडकरी मार्गावरील गोदामावर गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास एफडीएच्या आठ अधिकाऱ्यांच्या पथकाने तपासणी सुरू केली. तब्बल ११ तास ही झाडाझडती चालली. शुक्रवारी १४ ऑगस्टच्या पहाटे पाचपर्यंत ही कारवाई सुरू होती.
पार्लेच्या या गोदामात मुदत संपलेली विविध खाद्यपेये मोठ्या प्रमाणात आढळून आली. मुदत संपली तरी ग्राहकांच्या माथी ही शीतपेये मारली जात होती. पुढील आदेश मिळेपर्यंत या ठिकाणाहून कोणत्याही अन्नपदार्थाची विक्री अथवा वाहतूक करण्यास एफडीएने बंदी घातली आहे.