

मुंबई: सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अन्न आस्थापनांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) धडक मोहीम हाती घेतली आहे. २३ ते २७ सप्टेंबरदरम्यान मुंबईतील १३ अन्न आस्थापनांचे परवाने किंवा नोंदणी प्रमाणपत्रे तात्काळ निलंबित करण्यात आली आहेत.
या कारवाईत अन्न तयार करण्याच्या ठिकाणी उंदीर, झुरळे, माश्या, पाल, बुरशी, सांडपाणी, अस्वच्छ रेफ्रिजरेटर तसेच अन्नपदार्थांच्या साठवणुकीतील गंभीर त्रुटी आढळून आल्या.
काळबादेवीतील कयानी अँड कंपनीच्या तपासणीत अन्न तयार व साठवणूक क्षेत्रात मांजर, उंदरांची विष्ठा, जिवंत माश्या आणि मृत झुरळे आढळले. रेफ्रिजरेटरमध्ये मोठ्या प्रमाणात रक्त साचलेले होते, तर प्रक्रिया विभागात उघडे सांडपाणी मॅनहोल आढळले. अन्नपदार्थ जमिनीवर ठेवणे, कच्चे पीठ छापील वर्तमानपत्राने झाकणे आणि कच्चे व तयार अन्न वेगळे न ठेवण्याच्या त्रुटीही आढळल्या.
कुलाबा स्वीट मार्टमध्ये वजनकाटा व पॅकेजिंगवर जिवंत झुरळे, अन्न तयार करण्याच्या ठिकाणी पाल, माश्या आणि अळ्या आढळल्या. उघड्या अन्नपदार्थांजवळ अस्वच्छ पाण्याच्या बादल्या व मॉप ठेवण्यात आले होते. त्यामुळे परवाना तत्काळ निलंबित करून अन्नाची खरेदी, उत्पादन, साठवणूक, विक्री व वितरण बंद करण्याचे आदेश देण्यात आले.
धारावीतील अरुण विलास फरसाणमध्ये उंदीर व झुरळांचा प्रादुर्भाव, उंदरांनी कुरतडलेले पदार्थ, धुळीचे साम्राज्य, पंख्यांना जळमटे, जमिनीवर अस्ताव्यस्त साठा आणि पेस्ट कंट्रोलचे प्रमाणपत्र नसल्याचे आढळले.
विलेपार्लेतील डॅफोडिल्स फास्ट फास्ट इनमध्ये जमीन, भिंती व साठवणुकीच्या डब्यांवर धूळ-घाण, अस्वच्छ रेफ्रिजरेटर व डीप फ्रीझर आढळले. कामगार साठवणूक क्षेत्रातच झोपत असल्याचे तसेच वैयक्तिक वस्तू अन्नपदार्थांसोबत ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले.
लोअर परळमधील सबवेच्या तपासणीत खराब व वारंवार डीफ्रॉस्ट होणारा रेफ्रिजरेटर, बुरशीसदृश थर, दुर्गंधी आणि जिवंत झुरळ आढळले. स्वयंपाकघरात पाणी साचले होते, छताचे पोपडे निघाले होते आणि शाकाहारी व मांसाहारी पदार्थांची योग्य विभागणीही करण्यात आली नव्हती.
परळमधील रुची व्हेज रेस्टॉरंटचा परवाना निलंबित करून आस्थापना खाली करण्याची कारवाई करण्यात आली. याशिवाय क्यूएसआर ब्रँड्स इंडिया, रॉयल चायना, टिफिन, युनायटेड बेकरी अँड स्टोअर्स, श्री पद्मावती एंटरप्रायझेस आणि हॉटेल पुरंदर विलास यांच्यावरही अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या नियमांच्या उल्लंघनाबद्दल कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. चेंबूरमधील एस. एस. कॅटरर्स विनापरवाना सुरू असल्याने व्यवसाय तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले.
दरम्यान, जोगेश्वरीतील श्री पद्मावती एंटरप्रायझेसमधून ७,३४० किलो पामोलिन तेलाचा साठा जप्त करण्यात आला. या साठ्याची किंमत सुमारे ११ लाख ८१ हजार ७४० रुपये आहे. खाद्यतेलाच्या पॅकेजिंगसाठी पुनर्वापर केलेल्या टिनचा वापर केल्याचे आढळले.
अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सणासुदीच्या काळात मिठाई, दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल, फरसाण आणि अन्य अन्नपदार्थांची तपासणी आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.