

मुंबई : प्रकाश साबळे
मुंबई शहरांतील वाढते वायू प्रदूषण, विकास कामे यावर उपाययोजनांसह नियंत्रण व कारवाईसाठी आस्तित्वात असलेल्या मुंबई महापालिकेच्या पर्यावरण, वातावरणीय बदल विभागात गेल्या दीड वर्षांपासून अभियंत्यांची सुमारे 42 पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मुंबई महापालिकेत ऑक्टोबर -2024 मध्ये पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग कार्यान्वित केला खरा, मात्र अपुऱ्या मनुष्यबळाअभावी सदर विभाग वाऱ्यावर असल्याने मुंबई शहरातील पर्यावरणाविषयी पालिका प्रशासन किती गंभीर आहे, हे यावरून दिसून येते.
सदर विभागात उपप्रमुख अभियंता - 2, कार्यकारी अभियंता - 2, सहाय्यक अभियंता - 5, दुय्यम अभियंता - 33 असे एकूण 42 अभियंता संवर्गातील पदे रिक्त आहेत. ते भरण्याकडे नगर अभियंता विभागाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप पर्यावरण, वातावरणीय विभागातील सूत्रांनी केला. दरम्यान, याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी काय भूमिका घेतात, याकडे पर्यावरण, वातावरणीय बदल विभागातील अभियंत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.