

मुंबई : विवेक कांबळे
म्हाडा कार्यालय आणि वांद्रे-कुर्ला संकुलाला जोडणारा वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकाजवळचा स्कायवॉक डिसेंबरअखेरीस नागरिकांच्या सेवेत दाखल होईल, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या पूल विभागाकडून देण्यात आली आहे. डेडलाईन न पाळल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने ऑगस्ट महिन्यात झालेल्या सुनावणीत महापालिकेला फटकारत हा महापालिकेचा सुस्तपणा असल्याचे ताशेरे ओढले होते. त्यानंतर पालिकेने या स्कायवॉकच्या कामाला गती दिली आहे.
“कार्यस्थळाखालून अनेक वीज आणि गॅसवाहिन्या जात असल्यामुळे काम संथगतीने सुरु होते. आम्ही केवळ रात्रीच्या वेळी रहदारी नसताना काम करतो. जवळपास 80 टक्के काम पूर्ण झाले असून 31 डिसेंबरपूर्वी स्कायवॉक नागरिकांच्या वापरासाठी तयार असेल“, असे महापालिकेच्या पूल विभागाचे वरिष्ठ अभियंता उत्तम शोत्रे यांनी सांगितले.
मागील सुनावणी ऑगस्ट महिन्यात झाली होती, तर पुढील सुनावणी डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. वांद्रे पूर्वेतील ज्येष्ठ नागरिक के.पी. पुरुषोत्तमन नायर यांनी 2023 मध्ये दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालय सुनावणी घेत आहे. नायर यांनी पादचाऱ्यांसाठी अत्यावश्यक सुविधांच्या अनुपलब्धतेबद्दल प्रश्न उपस्थित केले होते.
प्रकल्पाचा इतिहास आणि चुकलेल्या डेडलाईन्स
वांद्रे पूर्वेला बीकेसीशी जोडणारा जुना पूल 2021 मध्ये पाडण्यात आला. त्यानंतर तो पुन्हा बांधण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला. एप्रिल 2023 मध्ये महापालिकेने सांगितले, की बांधकाम सुरु असून 15 महिन्यांच्या आत स्कायवॉक तयार असेल. ऑक्टोबर 2024 मध्ये न्यायालयाने म्हटले, की महापालिका जरी जून 2024 मध्ये प्रकल्प पूर्ण करण्याचे आश्वासन देत असली, तरी कामाची सुरुवातच मार्च 2023 मध्ये झालेली आहे.
न्यायालयाचा संताप :
वारंवार आश्वासने देऊनही मुंबई महापालिका हा स्कायवॉक बांधण्यात अपयशी ठरल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. “महापालिकेच्या सुस्तपणामुळे प्रवाशांना असुविधेचा सामना करत आपला जीवही धोक्यात घालावा लागत असल्याचे पाहून आम्हाला तीव्र वेदना होत आहेत. सुरक्षित पदपथ त्याचबरोबर पादचारी पुलांअभावी प्रवाशांना केवळ गलिच्छच नव्हे, तर अस्ताव्यस्त आणि प्रचंड गजबजलेल्या रस्त्यांवरून मार्गक्रमण करावे लागत आहे, असेही न्यायालयाने महापालिकेला सुनावले.