

मुंबई : राज्यातील शाळांसाठी पिरिऑडिकल असेसमेंट टेस्टच्या प्रश्नपत्रिकांमध्ये नवीन घोटाळा समोर आला आहे. गणिताच्या पेपरनंतरच इंग्रजीचा पेपरही उत्तरांसह यूट्यूबवर व्हायरल झाल्याच्या तक्रारी शिक्षकांनी केल्या आहेत.
एससीईआरटीकडून आयोजित करण्यात येत असलेल्या 13 ऑक्टोबरच्या इंग्रजी पेपरची प्रश्नपत्रिका 12 ऑक्टोबरलाच एका मराठी युट्यूब चॅनेलवर उघड झाली. यापूर्वी 10 ऑक्टोबरला गणिताचा पेपर व्हायरल झाला होता. या घटनेवर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, शिक्षण विभागाने त्वरित कारवाई सुरू केली आहे.
या परीक्षेमधून विद्यार्थ्यांना पास नापास ठरवले जात नाही. त्यामुळे इतका मोठा खर्च करण्याची गरज नाही. पूर्वीप्रमाणे शाळा स्तरावरच प्रश्नपत्रिका तयार केल्यास हा खर्च वाचेल, असे मत शिक्षक संघटनांनी व्यक्त केले आहे. या समस्येवर उपाययोजना करण्याची मागणी करत, शाळा स्तरावर प्रश्नपत्रिका तयार करण्याची परंपरा पुन्हा सुरू करण्याचा सल्ला प्राथमिक शिक्षक संघटना आणि शाळा प्रशासने दिला आहे.
शाळांनी यू-डायसमधील विद्यार्थी माहिती अद्ययावत केलेली नव्हती. 85 लाख विद्यार्थ्यांसाठी दोन कोटींपेक्षा अधिक प्रश्नपत्रिका पाठवल्यामुळे व्यवस्थापन कठीण झाले. विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना अभ्यासाच्या पातळीबद्दल जागरूक करणे हा परीक्षेचा उद्देश आहे. त्यामुळे या परीक्षाही महत्वाच्या आहेत, असे एससीईआरटीकडून स्पष्ट करण्यात आले.