

मुंबई: नारळी पौर्णिमेनिमित्त मुंबई शहर व उपनगरांमध्ये विविध ठिकाणी सराव शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या सराव शिबिरामध्ये मुंबई, ठाणे, अलिबागसह अन्य ठिकाणची गोविंदा पथके सहभागी झाली होती.
यामध्ये मुंबई, ठाणे, अलिबागमधील १९ गोविंदा पथकांनी नऊ थर लावण्यांपर्यत मजल मारली तर दोन महिला गोविंदा पथकांनी सात थरांची हंडी लावली.
सराव शिबिरातील दहीहंडी पाहण्यासाठी मुंबईकर उत्सवात सहभागी होत असतात. या उत्सवामध्ये आयोजकांकडून मोठ्या रकमेच्या पारितोषिकांचे वाटप केले जाते. त्यामुळे नारळी पौर्णिमेनिमित्त आयोजिलेल्या सराव शिबिरांमध्ये सहभागी होत गोविंदा पथके रंगीत तालमीचीच चाचपणी करत असतात.
या सराव शिबिरातील उत्सवामध्ये माझगाव-ताडवाडी, जय जवान - जोगेश्वरी, शिवसाई-बोरिवली, कोकण नगर- जोगेश्वरी, आर्यन्स - जोगेश्वरी, खोपट - ठाणे, अष्टविनायक - वडाळा, यश-वडाळा, मालपा डोंगरी - अंधेरी, ठाण्याचा राजा, कांजूरमार्गचा महाराजा, सीपी तलाव -ठाणे, विघ्नहर्ता - सांताक्रुझ, जरीमरी गिरगाव, रामनगरचा राजा - ठाणे, कांजूरमार्गचा राजा, शिवनेरी - भांडुप, ओमकार - गिरगाव, अलिबाग मेटपाडा या गोविंदा पथकांनी नऊ थर रचले.
दोन महिला पथकांनी सात थर रचले
महिला गोविंदा पथकांनीही ठिकठिकाणी सहभाग नोंदवत थरावर थर लावण्याचा प्रयत्न केला. यामध्ये पार्लेतील स्पोर्टस आणि ठाण्यातील शिवतेज या महिला गोविंदा पथकांनी सात थर रचले.