Mumbai Cyber Crime Cases: मुंबईकरांनो सावधान! सायबर गुन्ह्यांत ४४ टक्क्यांची वाढ

ऑनलाइन व्यवहारांवर सायबर चोरांची नजर; आठ महिन्यांत हजारो गुन्हे
Cyber Crime
Cyber CrimePudhari
Published on: 
Updated on: 

महेश पांचाळ

मुंबई: डिजिटल व्यवहार, ऑनलाइन खरेदी, गुंतवणुकीचे पर्याय आणि मोबाईल बँकिंगचा वाढता वापर यांसोबत मुंबईत सायबर गुन्ह्यांचे आव्हान अधिक गंभीर होत आहे. २०२६ मधील पहिल्या आठ महिन्यांत मुंबईत सायबर गुन्ह्यांमध्ये ४४ टक्क्यांची वाढ झाल्याची आकडेवारी समोर आली असून, या कालावधीत तब्बल ४ हजार २५४ गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

डिजिटल सुविधांचा विस्तार होत असताना नागरिकांची आर्थिक माहिती, बँक खात्यांचा तपशील आणि ऑनलाइन व्यवहारांची सुरक्षितता हा कळीचा प्रश्न बनला आहे.

Cyber Crime
Digital Extortion: गंडा घालण्याचा नवा फंडा! ‘मनी म्यूल’ खात्यांमधून फिरवतात रक्कम

सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांना लक्ष्य करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जात आहेत. बनावट गुंतवणूक योजना, शेअर बाजारातून मोठ्या परताव्याचे आमिष, बनावट ग्राहक सेवा क्रमांक, केवायसी अद्ययावत करण्याच्या नावाखाली पाठवलेले संदेश, बनावट मोबाईल ॲप आणि ओळखीच्या व्यक्तीच्या नावाने पैशांची मागणी अशा प्रकारांतून नागरिकांची फसवणूक होण्याचा धोका वाढला आहे.

काही प्रकरणांत सरकारी अधिकारी किंवा तपास यंत्रणेचे प्रतिनिधी असल्याचे भासवून नागरिकांना धमकावले जाते आणि कायदेशीर कारवाईची भीती दाखवून पैसे उकळले जातात.

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुक

मुंबई पोलिसांच्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते ऑगस्ट २०२६ या आठ महिन्यांत ४,२५४ सायबर गुन्हे दाखल झाले. गेल्या वर्षी याच कालावधीत २,९४८ गुन्ह्यांची नोंद झाली होती. म्हणजेच यंदा १,३०६ गुन्ह्यांची वाढ झाली आहे.

यापैकी १,१२१ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून, ७९४ जणांना अटक करण्यात आली आहे. ऑनलाइन फसवणुकीच्या २,२८३ प्रकरणांमध्ये शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुकीचे ३०२ गुन्हे नोंदवण्यात आले.

Cyber Crime
FDA Food Safety Action: सणासुदीपूर्वी FDA ची मोठी कारवाई; पालघरमध्ये १.५० कोटींचा गुटखा जप्त

गुंतवणुकीच्या अन्य फसवणुकीचे १५६, सरकारी अधिकारी असल्याचे भासवून किंवा डिजिटल अटकेची भीती दाखवून फसवणुकीचे ९५, नोकरीच्या आमिषाने ७७ आणि बनावट संकेतस्थळांद्वारे फसवणुकीचे ७६ गुन्हे नोंदवले गेले. या फसवणुकीच्या २,२८३ प्रकरणांपैकी ५३७ प्रकरणांची उकल झाली असून, ४७१ जणांना अटक करण्यात आली आहे.

कार्ड फसवणूक आणि हॅकिंगचेही आव्हान

क्रेडिट आणि डेबिट कार्डशी संबंधित ऑनलाइन फसवणुकीचे १,०२० गुन्हे नोंदवण्यात आले. त्याशिवाय हॅकिंगचे २०२, फिशिंग किंवा बनावट ई-मेलद्वारे हल्ल्यांचे १५१ आणि बनावट सोशल मीडिया खाती, छायाचित्रांमध्ये फेरफार किंवा संदेशांशी संबंधित १५१ गुन्हे दाखल झाले.

काही प्रकारच्या गुन्ह्यांत मागील वर्षाच्या तुलनेत वाढ झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते. त्यामुळे सायबर गुन्हेगारीचे स्वरूप बदलत असून, आर्थिक फसवणुकीबरोबरच डिजिटल ओळखीच्या गैरवापराचाही धोका वाढत आहे.

तक्रार नोंदवण्याचे आवाहन

  • सायबर गुन्ह्यांमध्ये पैसे गमावल्यानंतर सुरुवातीच्या काही मिनिटांत केलेली तक्रार महत्त्वाची ठरू शकते.

  • फसवणूक झाल्यास नागरिकांनी तातडीने १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइनवर संपर्क साधावा आणि राष्ट्रीय सायबर गुन्हे तक्रार पोर्टलवर तक्रार नोंदवावी.

  • संशयास्पद लिंकवर क्लिक करणे, अनोळखी व्यक्तींना ओटीपी देणे आणि खात्री न करता गुंतवणूक करणे टाळावे, असे आवाहन मुंबई सायबर सेलचे पोलिस उपआयुक्त बजरंग सोनवणे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news