

Mumbai Malavni Attack News
मालाड : मालाड पश्चिमेतील मालवणी परिसरात एका माथेफिरू तरुणाने धारदार शस्त्राने नागरिकांवर सलग हल्ले केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली. नवीन कलेक्टर कंपाऊंड परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या 15 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शुक्रवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास नवीन कलेक्टर कंपाऊंड येथील एका घराचा दरवाजा ठोठावून या तरुणाने पिण्यासाठी पाणी मागितले. घरातील १४ वर्षीय मुलाने पाणी आणून देताच, आरोपीने त्याच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केले आणि घटनास्थळावरून पळ काढला. जखमी मुलाला तातडीने उपचारासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुलाच्या मानेवर १५ टाके पडले असून त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे.
त्यानंतर शुक्रवारी दुपारी हा तरुण पुन्हा हातात धारदार शस्त्र घेऊन नवीन कलेक्टर कंपाऊंडमधील प्लॉट क्रमांक ३५, गेट क्रमांक ७ जवळ आला. तेथे त्याने दुसऱ्या एका मुलावर सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केले. तसेच रस्त्यावरील अन्य काही नागरिकांवरही त्याने हल्ल्याचा प्रयत्न केल्याचे समजते.
या घटनेनंतर संतप्त स्थानिक नागरिकांनी हल्लेखोराचा पाठलाग करून त्याला पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले. पकडल्यानंतर झालेल्या मारहाणीत किंवा अन्य कारणाने हल्लेखोराचाही मृत्यू झाल्याची चर्चा आहे; मात्र त्याबाबत पोलिसांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
या प्रकरणी मालवणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. हल्ल्यातील जखमींची नेमकी संख्या, मृत्यूबाबतची वस्तुस्थिती आणि हल्ल्यामागील कारण पोलीस तपासानंतरच स्पष्ट होईल.