

मुंबई : मुंबईतील वायुप्रदूषणाची पातळी दिवसेंदिवस खराब होत असताना, शहरातील बांधकाम परिसरात मोठ्या प्रमाणावर नियमबाह्य कारभार होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या पथकाने केलेल्या तपासणीत 1000 हून अधिक बांधकाम प्रकल्पांवर वायुप्रदूषण मोजणारे सेन्सर्स पूर्णपणे बंद असल्याचे उघड झाले आहे.
मुंबई महापालिकेच्या नियमांनुसार ज्या परिसरात बांधकाम सुरू आहे, त्याठिकाणी मॉनिटरिंग सेन्सर्स कार्यरत असणे बंधनकारक आहे. मात्र अनेक बांधकामठिकाणी हे सेन्सर्स बसवण्यात आलेले नाहीत किंवा ज्या ठिकाणी आहे, ते बंद आहेत.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पीएम 2.5. आणि पीएम 10 च्या वाढलेल्या पातळीमुळे दमा, खोकला, श्वास घेण्यातील त्रास अशा आजारांचे प्रमाण शहरात झपाट्याने वाढले आहे. बांधकाम परिसरातील धूळ नियंत्रणाची उपाययोजना योग्य नसेल तर प्रदूषण थेट वाढते,” असे तज्ज्ञांचे मत आहे.
या दरम्यान नियम मोडणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर थेट दंडात्मक कारवाई करण्याऐवजी महापालिकेकडून केवळ इशारे देण्यात येत असल्याचा आरोप रविराजा यांनी केला आहे. तसेच प्रदूषणामुळे मुंबईची हवा ‘अत्यंत खराब’ श्रेणीत पोहोचत असताना, पालिका कारवाईबाबत गंभीर नसल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात असल्याचा आरोप मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला.
कायद्यानुसार महापालिकेला सेन्सर न बसवणाऱ्या किंवा बंद ठेवणाऱ्या प्रकल्पांवर त्वरित दंड ठोठावणे, नोटीस देऊन काम थांबवणे, धूळ नियंत्रण प्रणाली बंधनकारकपणे सुरू ठेवण्याची सक्ती असे अधिकार आहेत.मात्र प्रत्यक्ष कारवाई न करता केवळ इशारे देण्यात येत असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
पश्चिम उपनगरांत प्रदूषण कायम
एक्यूआय संकेतस्थळावरील माहितीनुसार, पश्चिम उपनगरांमध्ये प्रदूषण कायम आहे. त्यात, चारकोप (एक्यूआय 184), बोरिवली-पूर्व (173), कांदिवली-पूर्व (169) ठिकाणांचा समावेश आहे. पूर्व उपनगरात भांडुप (162) तसेच चकाला, अंधेरीमध्ये (153) सर्वाधिक एक्यूआयची नोंद झाली.शनिवारी मुंबईत सरासरी 157 एक्यूआयची नोंद झाली.
100 ते 200 दरम्यानचा हवा गुणवत्ता निर्देशांक म्हणजे प्रदूषणाची मध्यम कॅटेगरी आहे. आठवड्याच्या सुरुवातीच्या तुलनेत एक्यूआय दोनशेपार गेला होता. मात्र, वीकेंडला दीडशेच्या आसपास स्थिरावला आहे. पीएम 10 आणि पीएम 2.5 चे प्रमाण अनुक्रमे 88 आणि 67 मायक्रो-ग्राम्स पर क्युबिक मीटर इतके नोंदले गेले. चार दिवसांपूर्वी हेच प्रमाण शंभरहून अधिक होते.